सोलापूर : हद्दवाढ भागातील अर्धवट स्थितीतील असलेल्या ड्रेनेजलाईनच्या कामाला पुन्हा नव्या जोमाने सुरुवात होणार असून आज मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मलनिस्सारण व्यवस्था व मलवितरिका टाकण्यासाठी ८१ कोटी ४ लाख ६७ हजार २८३ तर मलनिस्सारण केंद्र बांधण्यासाठी १०० कोटी १२ हजार १६ रुपये अशा एकूण १८१ कोटी ४ लाख ७९ हजार २९९ रुपयांच्या कामाला बहुमताने मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी सभापती बाबा मिस्त्री होते. दरम्यान, हेच काम यापूर्वी एसएमसी इन्फ्रा कंपनीला देण्यात आले होते. पण त्यांनी अतिशय संथगतीने व निकृष्ट दर्जाचे काम सुरु केल्याने आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले होते. या विषयावर बोलताना स्थायी समिती सदस्या विजया वड्डेपल्ली यांनी यापूर्वी हा मक्त एसएमसी कंपनीला देण्यात आला होता. त्यांनी काम व्यवस्थित केले नाही त्यामुळे वेळ वाया गेला आहे. याला तत्कालीन आयुक्त अजय सावरीकर व संबंधित अधिकारी जबाबदार आहेत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली. त्यामुळे सभापती बाबा मिस्त्री यांनी हा विषय बहुमताने मंजूर केला. स्थायी समितीच्या बैठकीत १० विषय घेण्यात आले होते, त्यापैकी ९ विषय बहुमताने मंजूर करण्यात आले तर १ विषय एकमताने मंजूर करण्यात आला. दरम्यान, सत्ताधार्यांनी आयुक्त गुडेवार यांनी पूर्वीच्या मक्तेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये घातले होते, ते त्यांना करण्याचा अधिकार आहे का? तसेच पूर्वीचा मक्तेदार हा न्यायालयात गेला आहे, ही बाब न्यायप्रविष्ट असताना हा प्रस्ताव मंजूर करता येतो का?, यापुढे काही झाल्यास त्याला आयुक्तच जबाबदार राहतील, असा ठराव केला होता. यावर नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी आक्षेप घेऊन जनहितासाठी आयुक्तांनी निर्णय घेतला आहे. त्यांना अधिकार आहे, असे सांगितले. त्यामुळे सत्ताधार्यांच्या सूचना वगळण्यात आल्या.
-----------------------
मुंबईची कंपनी करणार काम यापूर्वी तत्कालीन आयुक्त अजय सावरीकर यांच्या कालावधीत एसएमसी इन्फ्रा कंपनीला हा मक्ता देण्यात आला होता. मात्र संबंधित मक्तेदाराने संथगतीने या कामास सुरुवात केली होती. त्यामुळे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मक्तेदाराला १५ कोटींचा दंड करुन मक्ता काढून घेऊन मक्तेदाराला काळ्या यादीत टाकले होते. या बैठकीत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत सोलापूर शहर मलनिस्सारण व्यवस्था सुधारणा योजनेंतर्गत मलवितरिका टाकणे, या कामासाठी ८१ कोटी ४ लाख ६७ हजार २८३ किमतीच्या कामाचा मक्ता दास आॅफ शोअर, नवी मुंबई याला देण्यात आला आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत मलनिस्सारण केंद्र बांधण्यासाठी १०० कोटी १२ हजार १६ रुपयांचा मक्ता एच. एन. बी. इंजिनिअर्स, मुंबई याला देण्यात आला आहे.
------------------------------
ड्रेनेजलाईनच्या कामासाठी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी घेतलेला निर्णय जनहितार्थ असल्याने योग्य आहे. त्यांना मुंबई प्रांतिक महापालिका कायदा सी-३ नुसार अधिकार आहेत. सत्ताधार्यांनी केलेला ठराव हा चुकीचा होता.
- आनंद चंदनशिवे, नगरसेवक