सोलापूर : शहरात दाखल झालेल्या विविध गुन्ह्यात सात पोलीस ठाण्यात एकूण १९ आरोपींना न्यायालयाकडून फरार घोषित करण्यात आले आहेत. तर २६२ जण वॉन्टेडच्या लिस्टमध्ये आहेत, अनेक गुन्ह्यांचा गेल्या २० वर्षांपासून तपास लागत नसल्याने आरोपी सापडत नसल्याचे बोलले जात आहे.
शहर पाेलीस आयुक्तालयाच्या हद्दीत फौजदार चावडी पोलीस ठाणे, जेलरोड पोलीस ठाणे, सदर बझार पोलीस ठाणे, विजापूर नाका पोलीस ठाणे, सलगरवस्ती पोलीस ठाणे, जोडभावी पेठ पोलीस ठाणे हे सात पोलीस ठाणे कार्यरत आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या २० ते ३० वर्षापासून अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. चोरी, घरफोडी, अपघात असे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. बहुतांश गुन्ह्यातील आरोपी हे शहर व जिल्ह्याबाहेरचे असल्याने त्यांचा तपास करणे पोलिसांना कठीण जात आहे. चोरी, घरफोडीतील आरोपी हे पर जिल्हा व पर राज्यातील असल्याने त्यांचा तपास करणे खूपच कठीण आहे.
रस्त्याच्या कडेला, पालावर राहणारे काही लोक चोऱ्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशा अनेक लोकांना चोरीच्या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली होती, त्यांना पोलिसांनी न्यायालयासमारे उभे केले जाते. जामीन मिळाल्यानंतर आरोपी सोलापूर सोडून निघून जातात ते पुन्हा सापडत नाहीत. पकडण्यात आलेल्या चोरट्यांकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र असलेले आधारकार्ड, मतदान कार्ड नसते. त्यामुळे सोलापूर सोडून गेलेले आरोपी नंतर सापडत नाहीत. अशा गुन्हेगारांचा वॉन्टेडमध्ये समावेश होतो.
२० वर्षांपासून आरोपी सापडेना
- ० २०१० साली फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात माथेफिरूने एकाच रात्री एका पाठोपाठ एक चार खून केले होते. गवंडी गल्ली येथील एका घरासमोर, तरटी नाका पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तुळजाभवानी मटन स्टॉल समोर फुटपाथवर झोपलेल्या मामा व लहान भाचा तर तेथेच शेजारी असलेल्या मटन स्टॉल समोर झोपलेल्या व्यक्तीचा खून झाला होता. उन्हाळ्यामुळे हे लोक घराच्या बाहेर रस्त्याच्या कडेला झोपले होते. सिरिअल खुनाचा गुन्हा दाखल झाला, मात्र आरोपीचा शोध लागू शकला नाही.
- ० विजापूर नाका पोलीस ठाणे, जोडभावी पेठ पोलीस ठाणे, फौजदार चावडी पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या राष्ट्रीय महार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील बहुतांश आरोपींचा तपास लागला नाही.
मृत्यूनंतरही तपास सुरूच
दाखल गुन्ह्यातील आरोपीचा मृत्यू झाला तरी त्याचे मृत्यू प्रमाणपत्र जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत पोलिसांचा तपास सुरूच असतो. प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय तो मरण पावला आहे हे सिद्ध होत नाही. त्यामुळे अनेक प्रकरणात आरोपींच्या मृत्यूनंतरही तपास सुरूच राहतो.
पोलीस ठाणे फरार आरोपी
- फौजदार चावडी पोलीस ठाणे : ०४
- जेलराेड पोलीस ठाणे : ०२
- सदर बझार पोलीस ठाणे : ०४
- विजापूर नाका पोलीस ठाणे : ०४
- सलगरवस्ती पोलीस ठाणे : ०२
- एमआयडीसी पोलीस ठाणे : ०३
- जोडभावी पेठ पोलीस ठाणे : ००
अंतरजिल्हा, अंतरराज्य चोर करताना चोऱ्या
भांडण, मारामारी, अत्याचार, विनयभंग, खून, खुनाचा प्रयत्न आदी गुन्ह्यातील आरोपी कधी ना कधी सापडतात. मात्र कधीतर अचानक सोलापुरात येऊन चोरी किंवा घरफोडी करून गेलेल्या चोरट्यांना पकडणे कठीण जाते. अशा चोरांची कोणतीही ओळख पटत नसल्याने त्यांचा तपास होत नाही. अशा प्रकारच्या चोऱ्या करणाऱ्यांमध्ये ईराणी टोळीचा हात असल्याचे समजते. हे चोर चोरी केल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी येऊन चोरी करीत नाहीत असे बोलले जाते. नांदेड भागातीलही अशी टोळी असल्याचे बोलले जात आहे. दीड वर्षापूर्वी एकाच रात्रीतून मोबाइलची नऊ दुकाने फोडण्यात आली होती. चोरटे बाहेरचे असल्याने त्यांचा तपास लागला नाही.