अमित सोमवंशी
सोलापूर : लाचखोर अधिकारी व कर्मचाºयांचा पर्दाफाश करण्याची जबाबदारी शासनाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस लाचखोरांची संख्या वाढत चालली आहे. जिल्ह्यातील लाचखोरीची १९२ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असून, सर्वाधिक प्रकरणे ही सोलापूरन्यायालयात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांत १४ निकाल लागले असून, यात एकालाच शिक्षा लागली तर अन्य चौदा जण निर्दोष सुटले.
प्रशासनातील भ्रष्टाचाराची कीड नष्ट करण्यासाठी लाचलुचपत विभागाने कठोर पावले उचलली आहेत. हा विभाग कार्यरत असला तरी लाचखोरीची प्रकरणे कमी होत नसल्याने विभागाने अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. लाचखोरीच्या खटल्यात शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. लाच घेणे आणि देणे हा गुन्हा असला तरी सरकारी कामाची गती पाहता लाच देण्याचे प्रमाण वाढत आहे. लाच घेण्याबरोबरच देणाºयावरही कारवाई झाली पाहिजे.
लाचखोरीचे प्रकार वाढत असून, त्याला आळा घालणे गरजेचे आहे. गेल्या काही महिन्यांपासून लाचखोरांची संख्या वाढली आहे. एसीबीला प्रचंड गती दिल्याने संख्या दुपटीने वाढली. त्यासोबतच एसीबीच्या खटल्यामध्ये आरोपी निर्दोष सुटू नये, यासाठी प्रयत्न केले जातात. पंच, साक्षीदार, फिर्यादी फितूर होणार नाही, तपासात काही त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता घेतली जाते. चालू वर्षात २५ लाचखोरांना पकडण्यात आले. यात महसूलचे ६, पोलीस ६, शिक्षण विभाग २, जिल्हा परिषद २, पाटबंधारे ४, समाजकल्याण १, एमएसईबी २, सहकार २ आणि खासगी इसम १ अशा एकूण २५ जणांना लाच घेताना पकडण्यात आले.
दोन वर्षे; एकाला शिक्षा
- - २०१७ या वर्षात ९ केसेसचा निकाल लागला असून, त्यामध्ये ८ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली, तर एकाला शिक्षा लागली. २०१८ या चालू वर्षात पाच केसेसचा निकाल लागला असून, यात सर्व जण निर्दोष सुटले हे विशेष.
रक्कम परत मिळते
- - तक्रारदाराचा फोन आल्यास त्याची प्रतीक्षा न करता वेळप्रसंगी लाचलुचपत विभाग स्वत: त्याच्याकडे जाऊन तक्रारीची खातरजमा करीत असल्याचे सांगितले जाते. काही प्रकरणात तक्रारदाराप्रमाणे अखेरच्या क्षणी माघार घेतल्याने लाचलुचपत विभागाला रिकाम्या हाताने परत यावे लागते. तसेच लाचेची रक्कम संबंधित तक्रारदाराला महिनाभरात देण्यात येते.
चार वर्षांत १४२ गुन्हे लाचलुचपत विभागाने मागील चार वर्षांत २०१५ मध्ये ४५, २०१६ या वर्षात ३७, २०१७ मध्ये ३५ तर चालू वर्षात २५ अशा एकूण १४२ जणांना लाच स्वीकारताना पकडले.
प्रलंबित केसेसन्यायालय केसेस
- सोलापूर ११०
- पंढरपूर २४
- बार्शी २१
- माळशिरस १७
- एकूण १९२