सोलापूर : पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता सध्या आचारसंहिता लागू आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे. शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता जिल्ह्यात १९७ मतदान केंद्रे असतील, अशी माहिती निवडणूक कार्यालयाकडून मिळाली आहे.
निवडणुकीचे मुख्य कार्यालय पुण्यात असून सहायक निवडणूक कार्यालय सोलापुरात आहे. विभागीय आयुक्त हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत तर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. पदवीधर मतदारसंघाकरिता एकूण १२३ मतदान केंद्रे आहेत. मूळ मतदान केंद्रे १०९ असून, यास चौदा सहायक मतदान केंद्रे असतील.
ज्या ठिकाणी ७०० पेक्षा जास्त मतदार आहेत त्या ठिकाणी सहायक मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. शिक्षक मतदारसंघाकरिता एकूण ७४ मतदान केंद्रे असतील. मूळ मतदान केंद्रे ७१ असून तीन सहायक मतदान केंद्रे राहणार आहेत. दोन्ही मतदारसंघांकरिता जवळपास अकराशे कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.