आप्पासाहेब पाटील, सोलापूर : मुद्रा लाेन देतो म्हणून पावणे तीन लाखांची फसवणूक केल्याची घटना टेंभुर्णी (ता. माढा) येथे घडली आहे. याबाबत मनिषा तानाजी लकडे (वय ३८, रा. कुर्डूवाडी रोड, टेंभुर्णी) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, वृत्तपत्रात आलेल्या मुद्रा लोनच्या जाहिरातीमधील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून लोन संदर्भात चौकशी केली असता त्यांनी कर्ज देतो म्हणून २ लाख ७३ हजार रूपये वेळोवेळी ऑनलाइन भरायला लावून कर्ज न देता फसवणूक केल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे. मुद्रा लोनसाठी आधार कार्ड व पॅनकार्ड आवश्यक असल्याचं सांगत कर्जासाठी प्रोसेसिंग व इतर फी पाठविण्यास सांगून २ लाख ७३ हजार रूपये भरून घेतले. तसेच फिर्यादीचे वडील तानाजी लकडे यांच्या खात्यावरून एक लाख, पांडूरंग तोडकर यांच्या खात्यावरून २० हजार तसेच सतीष हांडे यांच्या फोन पे वरून १८ हजार रूपये जमा करून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबतची माहिती सोलापूर ग्रामीण पोलिसांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"