करमाळा : बंधन बँकेच्या करमाळा शाखेत २ कोटी १० लाखांचा घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, बँकेचे संचप्रमुख विनायक तोनशाळ (रा. कमला नेहरू पार्क, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार करमाळा शाखेची तपासणी करत असताना १२ फेब्रुवारी २०२१ रोजी ३०-३० लाखांच्या सात धनादेशांद्वारे दोन कोटी दहा लाख रुपये रकमेचे व्यवहार झाल्याचे दिसले; पण प्रत्यक्षात मात्र धनादेशाद्वारे व्यवहार झाल्याचे दिसले नाही. शोध घेतला असता शाखाधिकारी राहुल साहेबराव मुंडे (रा. शाहूनगर, करमाळा) यांनी काही साथीदारांसोबत या रकमा संगनमताने ट्रान्स्फर करून घोटाळा केल्याचे पुढे आले आहे.
या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी करमाळा शाखाधिकारी मुंडे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास करमाळा पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे करत आहेत.