सांगोला नगर परिषदेचे शहर व उपनगरात सुमारे १३,३६५ मालमत्ताधारकांसह ५,६०० नळ कनेक्शनधारक आहेत. गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सांगोला शहरातील मालमताधारकांकडे घरपट्टी व पाणीपट्टीची बिले भरण्यास दिरंगाई केली होती. दरम्यान, नगरपालिकेकडून चालू वर्षी मालमत्तेची सुमारे ४ कोटी ५ लाख ७ हजार तर पाणीपट्टीची ३ कोटी ६ लाख ८५ हजार अशी एकूण ७ कोटी ११ लाख ९२ हजार रुपये मागणी आहे.
मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी मालमत्ता कर वसुलीसाठी पाच पथके, तर पाणीपट्टी वसुलीसाठी तीन पथके नेमली आहेत. एक पथक नळ कनेक्शन बंद करण्यासाठी तैनात केले आहे. शहरातील मालमत्ताधारकांनी मालमत्तेची सुमारे १ कोटी ६५ लाख १५ हजार, तर पाणीपट्टीची १ कोटी ३० लाख ४ हजार रुपये थकबाकीसह चालू बाकी भरली आहे. नगरपालिकेतर्फे शहरातील नागरिकांना ध्वनिप्रक्षेकाद्वारे उद्घोषणा करून पाणीपट्टी, घरपट्टी थकबाकीसह चालू बिले भरण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
वसुली पथकातील अधिकारी, कर्मचारी
नगर परिषदेच्या मालमत्ता व पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष पथकामध्ये मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सभा लिपिक शरद माने, कर निरीक्षक तृप्ती रसाळ, पाणीपट्टी वसुली अधिकारी स्वप्नील हाके, आरोग्य निरीक्षक संजय दौंडे, वसुली अधिकारी लेखापाल जितेंद्र गायकवाड, लेखा पर्यवेक्षक विजय कन्हेंरे, अमित कोरे, योगेश गंगाधरे, शिवाजी सांगळे आदी कर्मचारी शहर व उपनगरात होम टू होम भेट देऊन कर वसुलीसाठी आवाहन करीत आहेत.
४ कोटी १९ लाखांची घरपट्टी, पाणीपट्टीची मागणी
सांगोला शहरातील १३,३६५ मालमत्ताधारकांकडे चालू घरपट्टीची २ कोटी २० लाख, तर पाणीपट्टीची १ कोटी ८९ लाख अशी एकूण ४ कोटी १९ लाख रुपये मागणी आहे, तर कोरोना प्रादुर्भावामुळे गतवर्षी करवसुलीची थकबाकी वाढली होती. १४ मार्चपर्यंत १ कोटी ६५ लाख १५ हजार मालमत्तेची तर १ कोटी ३० लाख ४ हजार रुपये वसुली झाली आहे.