राजकुमार सारोळे सोलापूर: केंद्र शासनाने अमृत योजनेतून हद्दवाढ भागासाठी मंजूर केलेल्या १७४ कोटींच्या भुयारी गटार योजनेचा २ लाख ६१ हजार नागरिकांना फायदा होणार आहे. नई जिंदगी, नीलमनगर, विडी घरकूल, हैदराबाद रोड, शेळगी परिसरात असलेल्या उघड्या गटारीमुळे दरवर्षी येणाºया साथीच्या रोगांपासून या नागरिकांचे संरक्षण होणार आहे.
महापालिकेच्या सभेत नव्या ड्रेनेज योजनेच्या ठेक्याला मंजुरी देण्यावरून गोंधळ झाला. ड्रेनेजलाईन टाकण्याचा ठेका नवी मुंबईच्या दास आॅफशोअरला देण्याला सदस्यांनी विरोध दर्शविला. याबाबत न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. पण या भागातील नागरिक सध्या उघड्या गटारीचे जे हाल सोसत आहेत, त्याचा विचार कोणीच केलेला दिसत नाही. हद्दवाढ भागातील नगरसेवकांनी मात्र ही योजना व्हावी म्हणून या परिसरातील परिस्थितीचा प्रश्न पोडतिडकीने मांडला.
दारासमोरून वाहणाºया उघड्या गटारी, त्यामुळे सुटणारी दुर्गंधी, गटारीचे मैदानात साठलेले पाणी आणि त्यामुळे निर्माण होणारे डास यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात या भागात साथीच्या रोगाचे थैमान असते. त्यामुळे येत्या दोन वर्षांत या भागात भुयारी गटारी झाल्या तर याचा या परिसरातील नागरिकांच्या राहणीमानावर परिणाम होणार आहे. याशिवाय भविष्यात देगाव, प्रतापनगर, कुमठे आणि आता देसाईनगर, हैदराबाद रोड येथे होणाºया मलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून बाहेर पडणारे पाणी उद्योगाला दिल्यावर त्याचा महापालिकेलाही फायदा होणार आहे.
‘लोकमत’ने वेधले होते लक्ष...-‘लोकमत’ने फेब्रुवारी २0१६ मध्ये लोकमत आपल्या दारी या उपक्रमांतर्गत नई जिंदगी, कुमठा नाका, इंदिरानगर, स्वागतनगर,आकाशवाणी रोड, अक्कलकोट रोड एमआयडीसी, नीलमनगर, विडी घरकूल, शेळगी, मित्रनगर या परिसरातील उघड्या गटारीमुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत नागरिकांच्या वेदना मांडल्या होत्या. याची दखल घेत १९ सप्टेंबर २0१७ रोजी शासनाने या योजनेला तांत्रिक मान्यता दिली. मूळ योजना १८0 कोटी २४ लाखांची आहे. याला केंद्र शासन ९0 कोटी १२ लाख, राज्य शासन ४५ कोटी ६ लाख निधी देणार आहे.
उर्वरित ४५ कोटी ६ लाख हा महापालिकेचा हिस्सा असणार आहे. हद्दवाढ भाग असल्याने उघड्यावरील तुंबलेल्या गटारीमुळे नागरिकांचे आरोग्य व दररोज भांडणाचे प्रकार ही समस्या गंभीर बनली आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी सतत पाठपुरावा केला. तसेच भागातून निवडून आल्यावर नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी पहिल्यांदा परिसरातील गटारी साफ करण्याची मोहीम राबविली.