सोलापूर : अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात महसूल विभागाच्या भरारी पथकाव्दारे गुरुवार, शुक्रवार, शनिवार असे सलग तीन दिवस धडक कारवाई करत दोन तराफा व १७ होड्या नष्ट केल्या असल्याची माहिती तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी दिली.
भीमा नदी पात्रात होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी पंढरपूर महसूल विभागाने पथकांची नेमणूक केली आहे. या पथकद्वारे पंढरपूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी भरारी पथकांची नेमणूक केली आहे.
भीमा नदी पात्रातील मौजे इसबावी, भटुंबरे येथे गुरुवार २९ रोजी अवैध वाळू उपसा करण्यात येत असल्याची माहिती महसूल प्रशासनास मिळाली. त्यानुसार तेथे पथकाने छापा टाकून १ तराफा व ९ होड्या ताब्यात घेऊन नष्ट केल्या आहेत. तर शुक्रवार ३० रोजी पंढरपूर परिसरात ३ होड्या तर शनिवार ३१ डिसेंबर 2022 रोजी गोपाळपूर , मुंढेवाडी, देगाव येथे १ तराफा ५ होड्या कारवाईत नष्ट केल्या आहेत.सदर ठिकाणी अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरु असल्याचे निर्देशनास आले. भरारी पथकाव्दारे सलग तीन दिवस धडक कारवाई केली असल्याचे माहिती तहसीलदार बेल्हेकर यांनी सांगितले.