मोहोळ: मोहोळ विधानसभेचे आ़ रमेश कदम यांनी मतदारसंघातील रस्त्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च २०१८ मध्ये निधीची तरतूद करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मोहोळ विधानसभा मतदारसंघातील अनेक वर्षांपासून दुरुस्तीसाठीच्या निधीपासून वंचित असणाºया महत्त्वाच्या मार्गांना निधी मंजूर केला आहे.
मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सहा मार्गांसाठी २० कोटी ६२ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे, अशी माहिती आ. रमेश कदम यांचे विधानसभा संपर्क प्रमुख राम कोरके यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना संपर्क प्रमुख राम कोरके म्हणाले की, मोहोळ विधानसभा मतदारसंघातील अनेक रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. याबाबतच्या अनेक मागण्या संपर्क कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. ही बाब आमदार रमेश कदम यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी मतदारसंघातील रस्त्यांसाठी ठोस निधीची तरतूद व्हावी, यासाठी निवेदन लेखी स्वरूपात पाठपुरावा सुरू ठेवला.
राष्ट्रपतीपदाच्या मतदानावेळी व विधान परिषद निवडणक मतदानाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोहोळ मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन २०१८ मध्ये निधी मिळावा, या आशयाचे गावनिहाय मार्गांचा सविस्तर उल्लेख असणारे मागणीचे निवेदन दिले होते. त्या मागणीची दखल घेत मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधीची तरतूद केली़
यापूर्वी देखील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत १४ कोटी रुपयांच्या निधीचे रस्ते मोहोळ विधानसभा मतदारसंघात आ़ रमेश कदम यांनी मंजूर करून आणले आहेत, असे यावेळी कोरके यांनी सांगितले. यावेळी आमदार रमेश कदम युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष अमित वाघमारे, रोहित क्षीरसागर, गणेश साबळे, रजनीकांत डोलारे, जगजीत सुत्रावे, महेंद्र वाघमारे, ऋषिकेश शिंदे, राहुल जोकारे, नितीन सकट, त्रिवेणी आण्णा मोगल इत्यादी उपस्थित होते.
तालुका व रस्ते दुरुस्तीकरिता मंजूर निधी...
- - मोहोळ रेल्वे स्टेशन ते वडवळ-गोटेवाडी-कुरुल-सोहाळे ते मुख्य राजमार्ग ४ कोटी २६ लाख.
- - मोहोळ तालुका-नजीक पिंपरी-शेजबाभुळगाव-अंकोली-इचगाव-जामगाव ते एम.डी.आर. ६३ पर्यंतचा रोड ५.४२ लाख.
- - उत्तर सोलापूर तालुका - अकोलेकाटी - बीबीदारफळ - सावळेश्वर रोड २ कोटी ७५ लाख.
- - उत्तर सोलापूर तालुका- लांबोटी-शिरापूर-मोरवंची-रानमसले-वडाळा रोड २ कोटी ९९ लाख.
- - पंढरपूर तालुका - रा.म. ९६५ ते मगरवाडी-तारापूर नाला रोड २ कोटी ७५ लाख.
- - पंढरपूर तालुका-गोपाळपूर-मुंढेवाडी-तुळे-आंबे-सरकोली रोड २ कोटी ४५ लाख.