गतवर्षी मार्चमध्ये कोरोनामुळे २२ मार्चला देशभरात लाॅकडाऊन करण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाने २२ मार्च ते २० ऑगस्ट या काळात बससेवा बंद ठेवली. या कालावधीत परप्रांतीयांना सोडण्यासाठी बससेवा सुरू होती. २० ऑगस्टनंतर बससेवा सुरू झाली, परंतु ५० टक्के प्रवासी संख्येची मर्यादा घालण्यात आली.
अकलूज आगाराच्या बस १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या वर्षात ७२ लाख ८० हजार कि. मी. धावून २७ कोटी ३७ लाख रु.चे उत्पन्न मिळाले होते. त्याच्या तुलनेत १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ अखेर संपलेल्या वर्षात कोरोनामुळे फक्त २३ लाख ४६ हजार कि. मी. बसेस धावून ७ कोटी १७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. अकलूज आगाराच्या बस ४९ लाख ४४ हजार कि.मी. कमी धावून आगाराचे २० कोटी २० लाख रुपयांनी उत्पन्न घटले आहे.
विद्यार्थ्यांचे प्रवास पास झाले बंद
ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी घरी बसून शिक्षण घेतल्याने सवलत दरातील विद्यार्थ्यांचे प्रवास पास बंद राहिले. जसजसा कोरोना प्रभाव कमी झाला तसे निर्बंध उठविण्यात आले. मात्र ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना व १० वर्षांखालील बालकांना बस प्रवास मनाई करण्यात आली. त्यामुळे कोरोना महामारीच्या वर्षभरात राज्य परिवहन महामंडळास अर्थिक फटका बसला आहे.
कोट :::::::::::::::::::::::::::::
कोरोनाच्या लाॅकडाऊन काळात सर्व पल्ल्यांच्या बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. फक्त परप्रांतीयांसाठी बस सेवा सुरू होती. लाॅकडाऊन संपल्यानंतर बससेवा सुरू केली, पण प्रवासी संख्या कमी राहिली. कोरोनाचा प्रभाव कमी झाला तशी प्रवाशांची संख्या वाढली. लांब, मध्यम व जवळ पल्ल्याच्या बस सुरू करण्यात आल्या आहेत. प्रति कि.मी. १८ रुपये उत्पन्न देणाऱ्या बस सुरू ठेवल्या. आगाराला मोठा अर्थिक फटका बसणार नाही. कोरोना महामारीत परप्रांतीयांना त्यांच्या राज्य सीमेपर्यत सोडण्याचे कर्तव्य आगारातील वाहक व चालकांनी केले. मुंबईकरांना बेस्टच्या माध्यमातून आजही सेवा देत आहेत.
- तानाजीराव पवार,
आगारप्रमुख, अकलूज