या कामाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी अंदाजपत्रक तयार करून त्याचा अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत शासनदरबारी पत्रव्यवहार करून, संबंधित खात्याचे मंत्री महोदय व अधिकारी यांच्याशी संपर्कात राहून, उपजिल्हा रुग्णालयाच्या मान्यतेसाठी सतत प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निधी मंजूर झाला आहे.
या संदर्भात पुन्हा आमदार राऊत यांनी १५ जून २०२१ रोजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन, या विषयावर सविस्तर चर्चा केली होती. त्यांनी शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या ३० बेडचे १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी प्रशासकीय मान्यतेसाठी अंदाजपत्रक तयार करून अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती.
त्यानुसार आरोग्य मंत्र्यांनी २१ जून रोजी उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव घेण्यात आला. या बैठकीत मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीने या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव सन २०२१ - २२ मधील अंदाजपत्रकात मुख्य लेखाशिर्ष ४२१० वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्यावरील भांडवली खर्च ०१, नागरी आरोग्य वैद्यकीय सहाय्यमध्ये समाविष्ट करण्याचे आदेश २८ जून रोजी अवर सचिव महाराष्ट्र राज्य यांनी पारित केले आहेत.
बार्शीमध्ये नव्याने होणाऱ्या १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयामुळे बार्शी शहर व तालुक्यातील गोर-गरीब व गरजू रुग्णांना चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा व उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
बार्शीच्या या उपजिल्हा रुग्णालयाचा निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांचे आमदार राऊत यांनी आभार व्यक्त केले आहेत.