माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागासह सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारा कारखाना म्हणून सदाशिवनगरच्या श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. मध्यंतरीच्या काळात हा कारखाना बंद होता; परंतु माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या सभासदांनी मोठ्या विश्वासाने हा कारखाना आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाच्या हाती दिला. सन २०२१- २२ च्या गळीत हंगामासाठी सुमारे ७ हजार ५०० एकर उसाची नोंद झाली आहे. कारखान्याने ४ लाख मे.टन उस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
..........
४ हजार सभासदांना लाभ
२०१५ - १६ हंगामात ऊस गाळप करून कारखाना बंद पडला. त्यामुळे ऊस उत्पादक, कामगार, व्यापाऱ्यांचे पैसे अडकले. आंदोलने करूनही पैसे मिळाले नव्हते. अखेर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले. कारखान्याच्या ४ हजार ३०० उस उत्पादक सभासद व बिगर सभासदांच्या २६ कोटी रकमेपैकी २० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले. एकूणच अनेक वर्षे अडकलेले बुडीत जमा धरलेले पैसे मिळाल्यामुळे बागायतदारांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.