सोलापूर : आरटीओच्या पथकाने प्रवासी म्हणून मोटरसायकल भाड्याने घेतली आणि आरटीओ कार्यालयाजवळ आल्यावर कारवाई केल्याची घटना घडली. अशाप्रकारे सोलापुरात नव्याने बेकायदा मोटरसायकलवर प्रवासी वाहतूक करण्याच्या प्रयोगाला दणका बसला आहे.
सोलापुरात एका कंपनीतर्फे खासगी वापराच्या मोटरसायकलवरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांना मिळाली. त्यानुसार यावर कारवाई करण्याचे आदेश भरारी पथकाला दिले. वायूवेग पथक क्र. १ मधील मोटार वाहन निरीक्षक अशोक खेनट, महेश रायभान, सहायक मोटार वाहन निरीक्षक नानासाहेब शिंदे हे आरटीओच्या जीपमधून चालक विशाल डोंबाळे यांच्यासह सायंकाळी सव्वासात वाजता शिवाजी चौकात आले. त्यांनी मोबाईल अॅपवरून प्रवासी वाहतुकीसाठी मोटरसायकलचे बुकिंग केले.
सात मिनिटांनी तेथे एमएच १३/एई ५५0६ या क्रमांकाचा मोटरसायकलस्वार तेथे आला. त्यावेळी साध्या वेषात असलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक शिंदे यांनी सुंदरमनगर येथे जायचे आहे असे सांगितले. त्या मोटरसायकलवर बसून ते आरटीओ कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत आले. थांबण्याचा इशारा केल्यावर मोटरसायकलस्वाराने अॅपवर पाहून २0 रुपये भाडे झाल्याचे सांगितले. भाडे दिल्यानंतर पाठीमागून जीपमधून आलेल्या मोटारवाहन निरीक्षकांनी त्याची चौकशी केली.
मोटरसायकलीच्या कागदपत्रांची मागणी केल्यावर त्याच्याकडे काहीच कागदपत्रे उपलब्ध नव्हती. मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलमानुसार खासगी वापरासाठी नोंद केलेले वाहन व्यापारासाठी वापरता येत नाही. तसेच व्यापारासाठी वाहनाचा वापर करावयाचा झाल्यास त्याची नोंदणी वेगळी आहे व चालकाचा परवानाही वेगळा आहे. असे असताना विनापरवाना खासगी वाहन व्यापारी कामासाठी तो वापरत असल्याचे आढळले. त्याच्याकडे वाहनपरवाना, आरसी, विमा, पीयूसी व प्रवासी वाहन नोंदणीची कोणतीच कागदपत्रे आढळली नाहीत. त्यामुळे वाहन मालक विश्वास यादव (सध्या रा. २३ दक्षिण कसबा, लक्ष्मी मार्केटजवळ, सोलापूर) व चालक विशाल विश्वास यादव या दोघांना मेमो देण्यात आला व मोटरसायकल जप्त करण्यात आली.
मोटरसायकल जप्त- मोटरसायकलवर प्रवासी वाहतूक करायची असेल तर त्याची वेगळी नोंदणी करायची गरज आहे अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी दिली. अशाप्रकारे आणखी वाहतूक होत असेल तरी कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. वायुवेग पथकाने पकडलेल्या मोटरसायकलस्वाराकडे कोणतीच कागदपत्रे नसल्याने आरसी बुक नसणे, विमा, पीयूसी व बेकायदा प्रवासी वाहतूक व असा वाहन परवाना नसणे या कलमाखाली मालकास साडेतेरा हजार दंड करण्यात येणार आहे. दंड वसुलीसाठी ती मोटरसायकल जप्त करण्यात आल्याचे डोळे यांनी सांगितले.