सोलापूर : क्र ॉसिंगला थांबलेल्या रेल्वे मालगाडीतून चोरट्यांनी पळविलेला २०० पोती तांदूळ हा पिकअप वाहनासह आरपीएफ जवानांनी कोम्बिंग आॅपरेशन राबवून पकडला़ या कारवाईत सात जणांना पकडून सोलापूर येथील फिरत्या न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावली. या तपासात जुने गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
१६ जून रोजी सायंकाळी ५़३० वाजता पाकणी परिसरात तांदळाची पोती घेऊन निघालेली मालगाडी क्रॉसिंगसाठी थांबली हाती़ टिकेकरवाडी येथील एफसीआय गोडावूनला हा तांदूळ निघाला होता. हीच संधी साधून काही चोरट्यांनी मालगाडीचे दरवाजे उघडून त्यातून तांदळाची २०० पोती पळवली़ ही घटना समजताच आरपीएफचे सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर यांनी आरपीएफ गुन्हे शाखा आणि आरपीएफ जवान असे दोघांचे संयुक्त पथक नेमले.
या पथकाने अनेक ठिकाणच्या खबºयांमार्फत माहिती घेतली़ त्यानंतर कोम्बिंग आॅपरेशन राबविले. विक्रम पुंड, श्रीकांत माने, महादेव मिसाळ, दिनेश गिराम, राहुल शिंदे, कृष्णा कोरे, हणमंत कोरे (सर्व रा. पाकणी, ता़ उत्तर सोलापूर) अशी कारवाईत पकडल्या गेलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत़ या आरोपींना सोलापूर येथे फिरत्या न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावली़ विश्वसनीय सूत्राकडून या सातपैकी दोन आरोपी हे सराईत असून त्यांनी यापूर्वी आणखी काही गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले़ दोन दिवसांच्या कोठडीनंतर आरोपींना दौंड येथील रेल्वे न्यायालयात हजर केले जाणार आहे़
तांदळाची पोती चोरीला गेल्याचे समजताच सुरक्षा आयुक्तांनी कोम्बिंग आॅपरेशन राबविण्याच्या सूचना दिल्या़ त्यानुसार आरपीएफ गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप देसवाल आणि निरीक्षक बी़ डी़ इप्पेर आणि पथकाला घेऊन तीन दिवस पाकणी परिसरात चोरांचा शोध घेतला़ या शोधमोहिमेत त्यांची नावे आणि ठिकाणे स्पष्ट झाली. याच काळात त्यांनी कोम्बिंग आॅपरेशन राबवून सात जणांना ताब्यात घेऊन त्यांनी लपवून ठेवलेला २०० पोती तांदूळ ताब्यात घेतला़ याबरोबरच हा तांदूळ ज्या वाहनातून पळवून नेला होता ती पिकअप व्हॅनदेखील ताब्यात घेतली़ या कामगिरीत उपनिरीक्षक एस़ के. यादव, सहायक उपनिरीक्षक सचिन मिस्कीन, प्ऱ आ़ के. एस़ फुलारी, आरक्षक डी़ बी़ कचरे, शशी गुरव, सचिन शिंदे, दिलीप पुंड, राजकुमार कापुरे, सचिन गावडे यांनी सहभाग नोंदवला़ सुरक्षा आयुक्तांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे़
प्रथमत: डिझेल अन् आता तांदूळ;दोन महिन्यातील दुसरी मोठी कामगिरीरेल्वेतील वाढत्या चोºयांच्या पार्श्वभूमीवर आरपीएफचे गुन्हे शाखा आणि नियमित पथक सतर्क झाले आहे़ मागील महिन्यात रेल्वे इंजिनमधून ८०० लिटर डिझेल पळविले होते. आरपीएफच्या पथकाने शिर्डी परिसरातून चोरलेले हे डिझेल पकडले होते. आता तांदूळ चोरीला जाताच कोम्बिंग आॅपरेशन राबवून माल पकडला. या कामगिरीचे आरपीएफ दलातून आणि रेल्वे खात्यातून कौतुक होत आहे़