सोलापूर : महापालिकेच्या केगाव येथील ४३ एकर जागेवर २० हजार झाडे लावण्यात येणार असल्याचे मनपा उपायुक्त धनराज पांडे आणि नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी गुरुवारी सांगितले. हा परिसर पिकनिक स्पॉट म्हणूनही विकसित करण्यात येणार आहे.
केगाव भागातील ही जागा पिकनिक स्पॉट, उद्यानासाठी आरक्षित आहे. आजवर अनेकदा या ठिकाणी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला. परंतु, तो तडीस गेला नाही. काही लोकांनी या जागेत खुदाई करून मुरूम चोरून नेला आहे. यंदा मनपा उपायुक्त धनराज पांडे यांनी या ठिकाणी वृक्षलागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरसेवक आनंद चंदनशिवे, उद्यान समितीचे सभापती गणेश पुजारी, नगरसेविका ज्योती बमगोंडे यांनी या ठिकाणी वृक्षलागवड व संरक्षक भिंत बांधण्यासाठी भांडवली निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या नगरसेवकांनी उपायुक्त धनराज पांडे यांच्यासमवेत गुरुवारी सकाळी या परिसराची पाहणी केली. यावेळी नगर अभियंता संदीप कारंजे, नगररचना विभागाचे प्रमुख लक्ष्मण चलवादी, विभागीय अधिकारी तपन डंके, उद्यान अधीक्षक निशिकांत कांबळे उपस्थित होते. आज, शुक्रवारपासून या ठिकाणी कामाला सुरुवात होईल, असे उपायुक्त पांडे यांनी सांगितले.
गेल्या १२ वर्षांपासून हा परिसर दुर्लक्षित आहे. या भागात एका पिकनिक स्पॉटची गरज आहे. उपायुक्त धनराज पांडे यांनी सहकार्याचे आश्वासन दिले आहे. यंदा वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण होईल. येथे एक जंगल तयार करून परिसराला संरक्षक भिंत बांधण्याचे कामही हाती घेण्यात येईल. यासाठी आम्ही भांडवली निधी देणार आहोत.
- आनंद चंदनशिवे, गटनेता.