करकंब येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ३० एप्रिल रोजी ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू झाले. या केंद्रामध्ये करकंब, उंबरे, जळोली, जाधववाडी, भोसे, नेमतवाडी, बार्डी, आव्हे या भागातील अनेक रुग्ण उपचार घेऊन आपापल्या घरी सुखरूप परतले. यामध्ये तीन वर्षांच्या बालकापासून ५० वर्षापर्यंतच्या अनेकांनी उपचार घेतले. दोन ते तीन रुग्णांचा अपवाद वगळता कोणालाही उपचारासाठी बाहेर पाठवण्यात आले नाही.
या सर्वांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय करकंब व करकंब परिसरातील स्थानिक डॉक्टर, आशा वर्कर, आरोग्य सेवक लादे, डॉ. सचिन लवटे व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधीक्षक प्रभा साखरे, शिक्षक, सरपंच तेजमाला पांढरे, उपसरपंच आदिनाथ देशमुख व कोरोना जनजागृती समितीचे सर्व सदस्य व गावातील समाजसेवी संस्थेचे योगदान लाभत आहे.
कोविड केअर सेंटर सर्वांसाठी उपयुक्त
प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी या सेंटरला भेट देऊन तिथल्या रुग्णांची विचारपूस करून त्यांचे मनोबल वाढवले. काही रुग्णांना पंढरपूर येथे एचआरटीसी व ब्लड टेस्ट करुन घेण्यास सांगितले. करकंब येथील ५० बेडचे कोविड केअर सेंटर हे सर्वांसाठी उपयुक्त ठरत आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये बदाम, काजू, खजूर, मसाला दूध, शीरखुर्मा, बिर्याणी, उकडलेली अंडी, मास्क, बिस्किटे सहारा बहुउद्देशीय संस्थेसह सचिन हराळे, कन्हैया काळे, यलाप्पा जाधव, अविनाश जाधव, सचिन शिंदे यांच्या वतीने वाटप करण्यात आले.
कोट ::::::::::::::
करकंब येथील कोविड केअर सेंटरमुळे अनेकांना जीवदान मिळाले आहे. यासाठी डॉक्टरांचे योगदान मोलाचे आहे. अनेक नागरिक प्रशासनाचे नियम पाळत नाहीत, तपासणीसाठी पुढे येत नाहीत. घरीच उपचार घेत आहेत. आपले गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे. योग्यवेळी उपचार घ्या आणि आपले गाव कोरोनामुक्त करूया.
- तेजमाला पांढरे
सरपंच, करकंब