मोहोळ : तालुक्यात ७६ ग्रामपंचायतींच्या ७३६ सदस्यपदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत ३१ डिसेंबर रोजी एकूण दाखल झालेल्या २१६६ अर्जांपैकी १७ अर्ज बाद झाले, तर २१४९ अर्ज वैध ठरले आहेत. बाद झालेल्या अर्जांमध्ये शिक्षणाची अट, वयाचा दाखला, अपत्य, ठेकेदारी, आर्थिक कामाची प्रकरणे अशा विविध कारणास्तव अर्ज छाननीप्रसंगी बाद झाले आहेत. ४ जानेवारी रोजी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. मोहोळ तालुक्यातील १०४ गावांसाठी ९४ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ७६ ग्रामपंचायतींसाठी पहिल्या टप्प्यामध्ये निवडणूक लागली आहे. दरम्यान, ३१ डिसेंबर रोजी अर्ज छाननीप्रसंगी दाखल झालेल्या २१६६ अर्जांपैकी १७ अर्ज विविध कारणास्तव बाद झाले आहेत. बाद झालेल्या अर्जांमध्ये ढोक बाबुळगाव १, सौंदाणे १, मसले चौधरी १, यल्लमवाडी १, जामगाव (बु) २, खंडाळी २, पापरी १, पेनूर २, मिरी २, वडाचीवाडी १, मुंढेवाडी १ असे एकूण १७ अर्ज वयाचा दाखला, अपत्य, ठेकेदारी, आर्थिक कामाची प्रकरणे अशा विविध कारणास्तव छाननीप्रसंगी बाद झाले आहेत.
दरम्यान, छाननी प्रक्रियाप्रसंगी उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी भेट दिली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अधिकारी राजशेखर लिंबारे, महसूल सहाय्यक एल. एन. शेख, महेश कोटीवाले, योगेश अनंत कवळस, संजय गोटीवाले, मोईन डोनगावकर, मनोज पुराणिक यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, लांबोटी ग्रामपंचायतीच्या एका जागेच्या अर्जाचा निकाल उशिरापर्यंत सुरू होता. त्याचा निर्णय समजू शकला नाही.