सोलापूर : राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघ व दूध पुरवठा करणाºया सहकारी संस्था खासगी दूध संघांमुळे बंद पडत आहेत तर या बंद संस्था अवसायनात काढण्याचे काम शासकीय यंत्रणा करीत आहे. २२ जिल्हा व तालुका संघ अवसायनात निघाले तर दोन बंद आहेत. गावपातळीवरील दूध पुरवठा करणाºया १५,५०३ संस्थाही कायमस्वरुपी बंद व अवसायनात काढण्यात आल्या आहेत.
राज्यात सहकाराचे जाळे घट्ट विणल्याचे सांगितले जात होते; मात्र मागील सात-आठ वर्षांत राज्यभरात खासगी दूध संघांची संख्या वरचेवर वाढत आहे. या खासगी दूध संघांमुळे सहकारी दूध संघ वरचेवर बंद पडले आहेत. बंद असलेल्या व अवसायनात काढण्यात आलेल्या दूध संस्थांची संख्या पाहता विदारक चित्र असल्याचे दिसत आहे. राज्यात जिल्हा व तालुका पातळीवरचे ९९ सहकारी दूध उत्पादक संघ आहेत. यापैकी २१ जिल्हा संघ तसेच ५४ तालुका दूध संघ सुरू असल्याचे सांगण्यात आले. तर २२ दूध संघ अवसायनात काढण्यात आले आहेत. दोन दूध संघ बंद पडले आहेत.
दूध संघापेक्षा गावपातळीवर सहकारी संस्थांची अवस्था फारच वाईट आहे. राज्यात नोंदणीकृत २७ हजार ५१४ इतक्या सहकारी संस्था आहेत. यापैकी १२ हजार ११ दूध संस्था सुरू आहेत; मात्र यामध्येही अनेक संस्था कशाबशा सुरू आहेत. अनेक वर्षे बंद असल्यामुळे १२ हजार ८५० दूध संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत. २,६५३ इतक्या संस्था बंद पडल्या आहेत. औरंगाबाद विभागात ५१९३, नाशिक विभागात ३७८१, अमरावती विभागात २१८७, नागपूर विभागात १२५८ तर पुणे विभागात २९५७ दूध संस्था बंद व अवसायनात काढण्यात आल्या आहेत.
पुणे विभागही अडचणीत राज्यात पुणे विभागातील पाच जिल्ह्यात दूध संकलन प्रतिदिन ७० ते ८० लाख लिटर इतके होत आहे. या विभागातील जिल्हा व तालुका पातळीवरचे दूध संघ व गावपातळीवरील संस्था खासगी दूध संघामुळे अडचणीत येत आहेत. तालुका पातळीवरचे पाच संघ बंद आहेत तर गावपातळीवरील २९५७ दूध संस्था बंद आहेत. दूध उत्पादनात आघाडीवर असलेला पुणे विभागही खासगी दूध संघामुळे अडचणीत येत आहे.
दोन तालुका पातळीवरील दूध संघ बंद पडलेरायगड, रत्नागिरी, जालना, परभणी, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली हे जिल्हा दूध संघ बंद पडल्याने अवसायनात काढले आहेत. पनवेल तालुका, भोर, कृष्णा व्हॅली, कोरेगाव,अजिंक्य, जामखेड,मालेगाव, साक्री, तळोदा, वणी, तुळजाभवानी, कन्नड, भूम, वाशी, वसंतदादा उस्मानाबाद या तालुका पातळीवरील दूध संघ अवसायनात काढण्यात आले आहेत. खामगाव व जावळी हे दोन तालुका पातळीवरील दूध संघ बंद पडले आहेत.