दीपक दुपारगुडे /सोलापूर : महूद येथे शालेय वेळेत विद्यार्थिनींना रोड रोमिओंच्या होणा-या त्रासाची दखल घेऊन सांगोला पोलिस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे आणि त्यांच्या पथकाने शाळा परिसरात फिरणाऱ्या २२ रोड रोमियोंची धरपकड करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. या कारवाईवर विद्यार्थिनी, पालकांनी समाधान व्यक्त केले.
महूद येथील शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणा-या आणि पंढरपूर व सांगोला येथे शिक्षण घेण्यासाठी जाणा-या विद्यार्थ्यीना शालेय वेळेत त्रास देणाऱ्या रोड रोमिओचा तात्काळ बंदोबस्त करावा अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थ, पालक यांनी सांगोला पोलीस स्टेशन, सरपंच ग्रामपंचायत महूद यांना दिले होते. निवेदनाची दखल घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड व पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी महूद येथे रोड रोमिओ पकडून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशा सूचना पोलीसांना दिल्या होत्या.
त्यानुसार महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे, पोलीस हवालदार बापूसाहेब झोळ, केदारनाथ भरम शेट्टी यांच्या पथकाने शाळा परिसरातील महूद- दिघंची रोड, संभाजी चौक,पवारवाडी रोड, सांगोला रोड ,मुख्य चौकात दुचाकीवरून विद्यार्थिनीच्या पाठीमागे फिरणा-या २२ रोड रोमिओंचा पाठलाग करून धरपकड करीत चांगलीच फजिती उडवून दिली.