दयानंद कुंभाररानमसले : येथील अवघ्या २२ वर्षांच्या युवा शेतकºयाने वाखाणण्याजोगे धाडसी निर्णय घेतला. आपल्या शेतातील परंपरागत पिकांऐवजी शतावरी या औषधी वनस्पतीचे उत्पादन घेतले. केवळ सव्वा एकरात ९ लाखांचे उत्पन्न कमावून या युवकाने आपल्या शेतीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
पिकांना बाजारात भाव मिळत नसल्याचे अनेकांचे सतत रडगाणे असते. मात्र सुदर्शन उर्फ नानासाहेब अनंत पाटील या युवा शेतकºयाने शतावरी या औषधी वनस्पतीची एका कंपनीच्या साथीने हमीभावाच्या करारावर लागवड केली. नोव्हेंबर २०१७ मध्ये संबंधित कंपनीसोबत करार करून त्याने सव्वा एकरात १ हजार १३३ रोपांची ८ बाय ६ अंतरावर ठिबक सिंचन करून लागवड केली. महिन्यानंतर प्रति रोपास १०० ग्रॅम लिंबोळी पेंड, मासळी खत, सहा टन गांडुळ खत दिले. आठवड्यातून एकदा ठिबकद्वारे जीवामृत सोडले. विशेष म्हणजे हे पीक कमी पाण्यावर येते. यामुळे पहिले सहा महिने आठवड्यातून फक्त एक तास ठिबक पाणी व सहा महिन्यांनंतर एक दिवसाआड एक तास ठिबकने पाणी दिले.
संबंधित कंपनीच्या मार्गदर्शनानुसार लिक्विड खते दिली. त्याचा चांगला फायदा झाला. या वेगळ्या वळणाच्या शेतीसाठी आपल्या वडिलांची मोलाची साथ मिळाल्याचे त्याने सांगितले.
सर्वप्रकारचे खत, खुरपणी, लिक्विड औषध, काढणीसाठी जेसीबी मशीन, मजुरी असा एकरी ५० हजार रुपयांचा मिळून एकूण एक लाख वीस हजारांचा खर्च आला.
१ हजार १३३ रोपांपासून सरासरी २० किलो मुळ्यांचे उत्पादन त्यांना अपेक्षित आहे. २२ टन मुळ्यांच्या उत्पादनात स्वच्छ करून वजन करेपर्यंत तूट वजा जाता कमीत कमी २० टन उत्पादनाची हमी आहे. या शतावरीच्या मुळ्या करारानुसार ५० रुपये किलो दराने विकल्या. सव्वा एकरात दहा लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले असून, खर्च वजा जाता ९ लाखांचे उत्पादन त्यांना अपेक्षित आहे.
कांदा, ऊस व भाजीपाला या खर्चिक पिकांपेक्षा बाजारातील मागणीनुसार पिकांचे उत्पादन घेतल्यास शेती तोट्यात जात नाही. त्यामुळे भाव मिळत नाही, या रडगाण्याचा विषयच येणार नाही.- सुदर्शन उर्फ नानासाहेब अनंत पाटील