पंढरपूर : यात्रा कालावधीत देव झोपत नाही. त्यामुळे विठ्ठलाचा पलंग काढण्यात आला आहे. यात्रेत देव न झोपता २४ तास उभा भाविकांना दर्शन देतो. देवाला आधार असावा, यासाठी मूर्ती मागे तक्का (लोड) ठेवण्यात आला आहे. सोमवारपासून लाडक्या विठुरायाचे भक्तांना मंदिर समितीच्या वेबसाईटवर २४ तास ऑनलाईन दर्शन मिळणार आहे.
१२ जुलै ते २५ जुलैदरम्यान आषाढी यात्रा प्राथमिक स्वरूपात होत आहे. प्रत्येक वर्षी यात्रेला होणारी गर्दी लक्षात घेता, यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून ‘श्रीं’चा पलंग काढून भाविकांना २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते.
सोमवारी सकाळी ११ : १५ वाजता परंपरेनुसार विठ्ठलाचा पलंग काढण्यात आला. यावेळी मंदिर समितीसह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते नैवेद्य दाखविण्यात आला. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज औसेकर, शकुंतला नडगिरे उपस्थित होत्या.
सोमवारपासून विठ्ठलाची काकडा आरती, पोषाख, धुपारती, शेजारती इ. राजोपचार बंद राहतील. मात्र, महानैवेद्य व गंधाक्षता एवढ्याच नित्यपूजा सुरू राहतील.
श्रींचा पलंग काढला आहे. यामुळे देव भाविक, भक्तांसाठी २४ तास उपलब्ध राहणार आहे. मंदिर समितीच्या संकेतस्थळावर व मोबाईल ॲपवर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान व खासगी वृत्तवाहिनीवर उपलब्ध असलेले विठ्ठलाचे दर्शन २४ तास सुरू असेल, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.