सोलापूर : दारूबंदी सप्ताहाच्या निमित्ताने राज्य उत्पादन शुल्क विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेत ५ ऑक्टोबर रोजी सोलापूर शहरात २४० लिटर हातभट्टी दारुची वाहतूक करताना दोन मोटरसायकली जप्त करून गुन्हे नोंदविण्यात आलेले आहे.
सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर दारूबंदी सप्ताह राबविण्यात येत असून त्यानिमित्त जिल्हाभरात विशेष मोहीम राबविली जात असून अवैध हातभट्टी दारू, देशी-विदेशी दारू, ताडी इत्यादी विरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे. ५ ऑक्टोबर रोजी दसरा सणानिमित्त सोलापूर महानगरपालिका परिसरात घोषित केलेल्या ड्राय डे च्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर शहर परिसरात पाळत ठेवून निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अ विभाग संभाजी फडतरे यांना जोडभावी पेठ परिसरात एका दुचाकीवरून हातभट्टी दारूची वाहतूक होताना आढळून आल्याने त्यांनी सदर वाहनाचा पाठलाग केला असता वाहतूकदार इसम वाहन जागीच सोडून फरार झाला, सदर गुन्ह्यात टीव्हीएस ज्युपिटर स्कूटी सह एका रबरी ट्युब मध्ये असलेली १२० लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली असून एकूण 56 हजार 100 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अ २ विभाग उषाकिरण मिसाळ यांनी राज मेमोरियल शाळेसमोर सरवदे नगर, जुना विडी घरकुल परिसरात एका होंडा कंपनीचे युनिकॉर्न मोटरसायकल वरून हातभट्टी दारूची वाहतूक होत असल्याचे दिसून आल्याने पाठलाग केला असता आरोपी वाहन सोडून फरार झाला. सदर गुन्ह्यात रबरी ट्यूब मधील १२० लिटर हातभट्टी दारुसह वाहन असा एकूण ६६ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. दोन्ही गुन्ह्यातील आरोपी फरार असून गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या वाहनांच्या रजिस्ट्रेशन क्रमांक काढून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक व उप अधीक्षक आदित्य पवार यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक संभाजी फडतरे , दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ , सहायक दुय्यम निरीक्षक बिराजदार, जवान चेतन व्हनगुंटी, प्रियंका कुटे, शोएब बेगमपुरे , इस्माईल गोडीकट व वाहन चालक मदने यांच्या पथकाने पार पाडली.