आतापर्यंत तालुक्यातील पहिल्या टप्प्यात ७२ गावातील लाभार्थ्यांना ४० कोटींच्या निधीचे वाटप होऊन एक महिना संपला. जिल्हयातील अतिवृष्टीतील दुसऱ्या टप्प्यासाठी २५० कोटींची मागणी शासनाकडे केली आहे. त्यातील बार्शी तालुक्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील ६७ गावांसाठी मिळणारा निधी प्राप्त न झाल्याने या गावातील लाभार्थी वंचित आहेत. तालुक्यात अतिवृष्टीचा निधी तातडीने मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन करूनही हा निधी शासनाकडून उपलब्ध झालेला नाही. आता आक्रमक पवित्रा घेण्याच्या पावित्र्यात शेतकरी आहेत.
बार्शी तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावात शासनाने मदत जाहीर करून त्यात सोयाबीन पिकासाठी हेक्टरी दहा हजार रुपये व फळबागांसाठी २५ हजार रुपये अनुदान जाहीर केले होते. ते अनुदान शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिले जाईल, असे आश्वासन शासनाने दिले होते. पण दिवाळी संपून दोन महिने झाले तरीही या तालुक्यातील अतिवृष्टीचे अनुदान तालुक्यातील लाभार्थींना मिळालेले नाही. ७२ गावांसाठी तहसील विभागामार्फत ४० कोटी ४२ हजार८०० रुपये अतिवृष्टीचे अनुदानाची रक्कम लाभधारकाच्या खात्यावर जमा झाली, परंतु दुसऱ्या टप्प्यातील लाभधारक मात्र अद्यापही वंचित आहेत.