पंढरपूर : १९८५ पासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडे २५ किलो ६६ ग्रॅम ३८७ मिली सोने तर चांदी ८३४ किलो २० ग्रॅम ६२४ मिली इतकी जमा झाली आहे़ जमा झालेले सोने वितळवून त्याची बिस्किटे (विटा) बनविण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितल्याची माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
पंढरपूर मंदिरे देवस्थान अधिनियमानुसार देवाला अर्पण करण्यात येणारे सोने -चांदीचे दागिने, वस्तू वितळवून घेताना शासनाचा प्रतिनिधी उपस्थित असणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे मंदिर समितीचा ठराव संमत झाला असून, शासनाकडे परवानगी मागितली आहे.
२६ फेब्रुवारी १९८५ रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा ताबा शासनाकडे आला. तेव्हापासून ३१ मार्च २०१८ पर्यंत मंदिर समितीकडे श्री विठ्ठल-रखुमाई चरणी अर्पण केलेले सोने २५ किलो ६६ ग्रॅम ३८७ मिली तर चांदी ८३४ किलो २० ग्रॅम ६२४ मिली इतकी आहे. भाविकांनी श्री विठुरायास अर्पण केलेल्या दागिन्यात सोन्याचा टोप, नाम, लॉकेट, कंठी, मासोळी, धोतर आदी दागिने, पूजेच्या वस्तू तर श्री रुक्मिणीमातेला गंठण, पोहेहार, बोरमाळ, कर्णफुले, तोडे, पाटल्या, पैंजण, जोडवी, मासोळी आदी दागिन्यांचा व विविध वस्तूंचा समावेश आहे. या वस्तू व दागिने सांभाळणे हे जिकरीचे होऊ लागले आहे़ सोने वितळवून बिस्किटे बनवून बँकेत ठेवणे सोपे आहे म्हणून हा महत्त्वपूर्ण निर्णय समितीने घेतला आहे.
तर बिस्किटे, विटा बनविणार- विठ्ठल-रुक्मिणीला भक्तांकडून मिळालेले सोने विटा व बिस्किटे बनवण्याची परवानगी शासनाकडून मिळाल्यास राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार याकामी विधी व न्याय विभागाचे प्रतिनिधी तसेच मंदिर समितीचे प्रतिनिधी नेमण्यात येतील. त्याप्रती व कॅमेºयासमोर मंदिरातील सोने सीलबंद करण्यात येईल. ते सोने शासनमान्य सोने वितळविण्याच्या ठिकाणी वितळवून त्याचे बिस्किटे व विटा बनवण्यात येणार आहेत.