पंढरपूर : देशातील उच्चशिक्षित अशी ओळख असलेल्या केरळ राज्याला पावसाचा मोठा तडका बसला. १४ जिल्हयांपैकी १३ जिल्ह्यातील लोकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले. आर्थिक नुकसान झालेल्या केरळच्या मदतीसाठी साक्षात दक्षिण काशीचा राजा पांडूरंग धावून गेला आहे. पंढरपूर येथील विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीने येथील नागरिकांच्या पुनर्वसनाच्या कामासाठी २५ लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांनी आज ही घोषणा केली.
गरिबांच्या मदतीला नेहमीच पंढरीचा पांडुरंग धावून जातो. जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्तीचे संकट येते अशा वेळी मंदिर समितीने मदत दिली आहे. २०१४0 साली राज्यात दुष्काळ पडला होता. त्यावेळी दुष्काळी गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मंदिर समितीने मदत केली. केरळमध्ये पावसाने थैमान घातले होते. यामध्ये जीवित व आर्थिक हानी झाली आहे. येथील नागरिकांना मानसिक व आर्थिक आधार देण्यासाठी जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
केरळ राज्यात महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील अनेक लोक रोजगाराच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत. महाराष्ट्रातील लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा दुहेरी भूमिकेतून पंढरपूरच्या विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने केरळसाठी 25 लाखांची मदत जाहीर केली आहे.