मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका कोरोनामुळे लांबणीवर पडल्या. त्यामुळे कधी नव्हे ते एकूण ७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार असल्याने अनेक नाराज आहेत. शिवाय पॅनलचा खर्च कोणी करायचा याबाबत संभ्रम आहे. केवळ त्यामुळेच ग्रामपंचायत बिनविरोध होण्याचा कल वाढला आहे.
तालुक्यात काँग्रेस आणि भाजप हे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत होते. यंदा यावेळी त्यात शिवसेना, राष्ट्रवादी पक्षही शिरकाव करण्याच्या प्रयत्नात आहेत.
या ग्रामपंचायतींची बिनविरोधसाठी धडपड
जेऊर, वागदरी, मुगळी, उडगी, चपळगाव, बनजगोळ, तोरणी, बोरोटी खुर्द, चपळगाववाडी, चुंगी, डोंबरजवगळे, गळोरगी, गौडगाव खु, गोगाव, हैद्रा, काझीकाणबस, कुमठे, खैराट, मोट्याळ, पितापूर, सांगवी खु, सिन्नूर आदी २५ गावांत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जोरदार चर्चा सुरू आहे.
प्रशासन सज्ज
अक्कलकोट तालुक्यात तब्बल ७२ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी सर्व कामे उरकून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रशासन सज्ज ठेवले आहे. एकूण प्रभाग २३५, सदस्य जागा-६३४, एकूण मतदार एक लाख ३४ हजार ४३९, स्री ७० हजार ४६५, पुरुष ६३ हजार ९६७, तृतीयपंथी-७ अशी संख्या असल्याचे तहसीलदार अंजली मरोड यांनी सांगितले.
बिनविरोध ग्रामपंचायतीसाठी १५ लाखांचा निधी
ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्यास शासनाचा विकास निधी तर मिळतोच त्याबरोबरच बिनविरोध होणाऱ्या प्रत्येक गावांना १५ लाख रुपये तत्काळ देणार असल्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जाहीर केले. याबाबत संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे.