बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर: ग्रामपंचायत कराची रक्कम फोन पे द्वारे स्वीकारल्या प्रकरणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव येथील सरपंच सफलता प्रभाकर पाटील यांचे सरपंचपद व सदस्यत्वही पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी अपात्र ठरविले आहे.
या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्या मीरा ज्ञानदेव साळुंखे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती. सरपंच सफलता पाटील यांनी ग्रामपंचायत हद्दीतील इको इंडस्ट्रीज या कंपनीकडून पंचवीस हजाराची कराची रक्कम पती प्रभाकर पाटील व त्यांचे संयुक्त बँक खाते असलेल्या फोन पेवरून स्वीकारली. ती रक्कम ग्रामपंचायत निधीमध्ये वर्ग न करता परस्पर लाटून भ्रष्टाचार केला आहे, सरपंचास मिळणारे मानधन सुद्धा त्यांच्या खात्यावर स्वीकारले.
गावाला पुरविण्यात येणार्या शुद्ध पाणी प्रकल्पात आर्थिक अनियमितता झालेली आहे. यावरून सरपंच बेजबाबदार, बेकायदेशीर कृत्ये करत असल्याची तक्रार मीरा साळुंखे यांनी केली. या प्रकरणी सफलता पाटील यांचे सरपंच व सदस्य पद रद्द करण्याची मागणी देखील साळुंखे यांनी केली होती.