बार्शी : बार्शी शहर व तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेषतः २० दिवसांपासून ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसात १५६ कोरोना रुग्णांची वाढ नोंदली गेली आहे तर दिलासादायक बाब म्हणजे २६३ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. तर दुसरीकडे दहाजणांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे.
बाधित रुग्णांमध्ये बार्शी शहरात ४२ तर ग्रामीण भागात ११८ रुग्ण असल्याची माहिती तालुका प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे यांनी दिली.
दोन दिवसात १,३९३ जणांच्या रॅपिड व आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. चाचण्यांच्या संख्येच्या प्रमाणात बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे.
शहरात २३८ तर ग्रामीण भागात ८५५ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. बार्शीत हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांची संख्या जास्त आहे. आता डेडिकेटेड कोविड सेंटर आणि हॉस्पिटलची संख्यादेखील वाढली आहे. ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये एचआरसीटी स्कोअर जास्त आढळत आहे. चाचण्यांचे प्रमाणही निम्म्याहून कमी झाले आहे. रॅपिड अँटिजन किटचा आणि रेमडेसिविर इंजेक्शनचाही तुटवडा आहे.