सोलापूर :
दोघा ज्येष्ठांच्या आवडी-निवडी अन् विचारही सारखेच.. ते दोघं कधी स्वत:ला ज्येष्ठ समजत नाही.. त्यांच्यातली तरुणाई भ्रमंती घडवते... दोघांनी ठरवलं, २६०० किलोमीटर सायकलवारी करीत कन्याकुमारी गाठायचं.. अन्नत्याग करून केवळ दूध-केळीवर त्यांनी दहा दिवसांत मोठं अंतर पार करून ध्येय गाठलंय.
विठ्ठल कदम (वय ७७) आणि श्रीशैल नवले (६०) असे त्या दोन तरुण ज्येष्ठांची नावे आहेत. सोलापुरात नीलम नगर परिसरात नवले नगरमधील या दोघांनाही पूर्वीपासून फोटोग्राफीचा छंद होता. सध्या विठ्ठल कदम हे वीटभट्टी चालवताहेत तर श्रीशैल नवले हे प्लॉटिंगचा व्यवसाय करताहेत. दोघांचा छंद बाजूला पडला असला तरी दोघे विचारांनी आणि मनाने एक आहेत. दिवसभरात वेळ काढून गप्पा मारत नव्या कल्पना रचत जीवनातला खरा आनंद ते लुटताहेत.
दहा दिवसांपूर्वी या दोघांनी स्वामी विवेकानंद जाणून घेण्यासाठी सोलापूर-कन्याकुमारी सायकलवारी सुरू केली. प्रवासात शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून दोघेही अन्नाऐवजी दूध-केळी, लिंबू पाणी, नारळ पाणी घेतात. तसेच हवा भरणारा पंप, पंक्चर साहित्य सोबत ठेवले आहे. तसेच रात्री तळव्यांना तेल लावून चोळतात. रात्री कुटुंबाशी फोनवरून संवाद साधतात. विठ्ठल कदम यांनी मागील सहा वर्षांपासून मौन धारण केले असून, जे काही सांगायचे आहे, ते एका चिठ्ठीवर लिहून सांगतात.दररोज दहा तास सायकलया प्रवासात दोघे दररोज १० तास सायकलवर अंतर पार करताहेत. तासी १२ किलोमीटर अंतर आणि जोराचा वारा असेल तर १० किलोमीटर अंतर कापताहेत. दहा दिवसांत १२९० किलोमीटर अंतर पार करायची जिद्द ठेवून दोघेही घराबाहेर पडले. रात्री मंदिर किंवा खोली घेऊन आराम करतात. अशा पद्धतीने २४ फेब्रुवारी रोजी दोघेही कन्याकुमारीत पोहोचले अन् समुद्र किनाऱ्यावर आनंद लुटत स्वामी विवेकानंदांचं स्मारक, साहित्य जाणून घेतलं. तसेच कन्याकुमारी- रामेश्वर ३५० किलोमीटर अंतरही तीन दिवसांत पार केले.