सोलापूर : दररोज छोट्या-मोठ्या घटना आसपास घडत असतात. यातूनच एखादी मोठी हिंसक घटना होत असे. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांना पुढे यावे लागते. त्या वेळी पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात समोरील दगड, अथवा आपल्यावर होणारे हल्ला रोखण्यासाठी लोखंडी ढाल असायची. दोन दंगलींत चांगलीच साथ दिलेल्या अशा २७० ढाली आता मुख्यालयातील वृक्षांचे रक्षण करीत असताना पोलिसांनी टाकाऊपासून टिकाऊ हा उपक्रम यशस्वी केला आहे.
पहिल्या ढाली निवृत्त होऊन आता पोलीस मुख्यालयामध्ये झाडांची सुरक्षा करीत आहेत. पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी पूर्वी हातात लोखंडी मोठी ढाल असायची. ती जाळीदार होती. ढाल जाळीदार असल्यामुळे त्यातून छोटे खडे, माती पोलिसांच्या शरीरावर पडत असे. ही लोखंडी ढाल वजनाने जास्त असल्यामुळे पोलिसांनाही कारवाईवेळी थोडे अवघड होत असे. यामुळे वेळेनुसार या ढालीच्या जागी आता नवीन फायबरची ढाल पोलिसांच्या मदतीला आली आहे. ही चांगल्या दर्जाची पारदर्शक आणि वजनाने हलकी असल्यामुळे पोलिसांना हिचा फायदा होत आहे.
सोलापूर शहर मुख्यालयात अशा जुन्या झालेल्या लोखंडी ढालींनी कम्पाउंड, झाडांसाठी सुरक्षा भिंत तयार करण्यात आली आहे. या ढाली १९९२ आणि २००२ या दोन्ही दंगलींमध्ये पोलिसांच्या मदतीला आल्या होत्या. आता हे ‘गार्ड’ सध्या झाडांचे संरक्षण करीत आहेत. २००४ साली या गार्डच्या ऐवजी फायबर ढाल बाजारात आल्या. त्यानंतर लोखंडी ढाल वापरणे बंद करण्यात आले. या ढालींचा उपयोग करून जवळपास अर्धा किलोमीटरचे कम्पाउंड तयार करण्यात आले आहे. यासाठी जवळपास दोन दिवस पोलिसांना श्रमदान करावे लागले. प्रत्येक ढाल ही ३ बाय २ फुटांची आहे.
पोलीस जास्त कल्पक नसतात किंवा संवेदनशील नसतात, असा आरोप केला जातो. पण, पोलिसांनीच या लोखंडी शिल्ड अर्थात ढालींचा वापर कल्पकतेने केला आहे. यामुळे झाडांचे संरक्षणही होत आहे व सौंदर्यात भरही पडत आहे. - डॉ. दीपाली धाटे, पोलीस उपायुक्त
दोन दंगलीत वापरलेल्या जवळपास २७० ढाली (गार्ड) वापरात येत नव्हत्या. त्यांचा पुनर्वापर व्हावा म्हणून पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे यांच्या मार्गदर्शनाखाली या ढालींचा वापर करण्यात आलेला आहे.- भगवान टोणे, पोलीस निरीक्षक