साेलापूर : महापालिका आयुक्तांनी मार्च २०२० मध्ये निश्चित केलेल्या दरानुसार भाडे वसूल करण्यासाठी पार्क स्टेडियममधील २८ गाळ्यांना सील ठाेकण्यात आले. गाळेधारकांनी शासन निर्देशानुसार १९ रुपये प्रतिचाैरस फूट दराने भाडे भरण्याची तयारी दाखविली. मात्र, प्रशासनाने ४८ रुपये प्रतिचाैरस फूट दराने वसुली सुरू केली आहे.
महापालिकेने मार्चअखेर भाडे वसुलीची कारवाई सुरू केली आहे. सहायक आयुक्त विक्रमसिंह पाटील म्हणाले, मनपाचे पार्क स्टेडियममध्ये एकूण ५९ गाळे आहेत. या गाळ्यांची मुदत २०१७ मध्ये संपली. बाजारभावानुसार भाडे वसुलीसाठी नाेटिसा बजावल्या. गाळेधारकांनी भरण्यास नकार दिला. यावर सुनावणी झाली. यावेळी प्रशासनाने केलेल्या मूल्यांकनानुसार प्रतिचाैरस फूट ४८ रुपयेप्रमाणे भाडे वसूल करण्याचा निर्णय झाला. यादरम्यान राज्य शासनाकडून सप्टेंबर २०१९ मध्ये अधिसूचना आली. यानुसार प्रतिचाैरस फूट १९ रुपये या रेडिरेकनरनुसार भाडे भरण्याची विनंती गाळेधारकांनी केली. प्रशासनाने मार्च २०२० मध्ये चालू बाजारभावानुसार ४८ रुपये प्रतिचाैरस फुटाचा दर निश्चित केला हाेता. या दरानुसार भाडे न भरणाऱ्या गाळेधारकांना नाेटिसा बजावल्या. या नाेटिसीप्रमाणे कार्यवाही न करणाऱ्या चार गाळेधारकांचे गाळे शनिवारी सील केले. रविवारी २४ गाळे सील केले. रविवारी काही गाळेधारकांनी पालिकेच्या नावे धनादेश दिले हाेते. साेमवारी ही दुकाने खुली हाेतील.
--
संस्मरण उद्यानावर आज सुनावणी
पाेलीस आयुक्तालयाजवळील संस्मरण उद्यानाला बाजारभावानुसार भाडे भरण्याची नाेटीस आयुक्त पी. शिवशंकर यांनी बजावली आहे. यासंदर्भात यापूर्वीच्या एका उपायुक्तांनी भाडेकरूच्या बाजूने दिलेल्या निकालाची फेरतपासणी सुरू आहे. भाडेकरू संस्थेने आयुक्तांकडे मुदत मागितली हाेती. यावर साेमवारी सुनावणी हाेणार आहे. संस्मरण उद्यानाचे बाजारभावानुसार भाडे वसूल हाेईल. परिसरातील अतिक्रमण हटवण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.
--
दाेन गाळ्यांचे आठ दिवसांत लिलाव
लाल बहादूर शाॅपिंग सेंटर, कित्तूर चन्नम्मा शाॅपिंग सेंटरमधील दाेन गाळे पालिकेने ताब्यात घेतले आहेत. या गाळ्यांचे लिलाव या आठवड्यात हाेतील. थकबाकी वसुलीसाठी गाळे जप्तीची कारवाई मार्चनंतरही सुरू राहील, असे पाटील यांनी सांगितले.
-