करकंब (सोलापूर) : येथील मौलाना आझाद न्यू इंग्लिश स्कूल व अरबी मदरसामध्ये शिळे अन्न खाल्ल्याने २९ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांना विषबाधा झाली. सर्वांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मुख्याध्यापक आणि संस्थापक अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी सायंकाळी नईम बागवान यांनी विद्यार्थ्यांना मासे दिले होते. मात्र, सायंकाळचे जेवण तयार असल्याने बागवान यांनी दिलेले मासे तेलामध्ये फ्राय करून ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास विद्यार्थ्यांना शिळे मासे खाण्यास देण्यात आले. यानंतर सायंकाळी भेंडी, बटाटा, पातळ भाजी, भात हे जेवण दिले. बुधवारी विद्यार्थी आणि शिक्षकांना उलटी, जुलाब, ताप अशा प्रकारचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.