सोलापूर: पंढरपूर तालुक्यातील ५१ गावांमध्ये २ हजार ९४५ इतक्या मोडी लिपीतील कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. या अभिलेखांचे प्रथम स्कॅनींग करण्यात येणार असून, मराठी भाषेमध्ये रुपांतर करुन ते प्रमाणित केल्यानंतर स्कॅनींगच्या पी.डी.फ फाईल संबंधीत गांवच्या नागरीकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच शासनाच्या अधिकृत संकेत स्थळावर प्रसिध्द करणेत येणार आहे. हे कामकाज प्रगतीपथावर असल्याचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी सांगितले.
पंढरपूर तालुक्यातील सर्व गावांमध्ये मोडी लिपीतील कुणबी नोंदीचे सर्व अभिलेख ॲड. सुधीर रानडे, ॲड अशुतोष बडवे, ॲड संतोष घाडगे, या मोडी लिपी जाणाकारांमार्फत तपासलेल्या आहेत. त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील ५१ गावांमध्ये २,९४५ इतक्या मोडी लिपीतील कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत.या अभिलेखाचे कामकाज प्रगतीपथावर आहे.
तालुक्यातील शोधमोहीमेबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे विहीत कालावधीत शोधमोहीम राबविलेली आहे.
५ लाख ३१ हजार नोंदी तपासल्याया शोधमोहिमेमध्ये पंढरपूर तालुक्यातील सन १९६० पूर्वीची एकूण ८४ गावांमधील (सध्याची ९५ गावे) सर्व अभिलेखांतील नोंदीची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण ५, ३१, ०४१ इतक्या मराठी भाषा व मोडी लिपीतील नोंदी तपासण्यात आल्या. त्यापैकी भोसे, कासेगांव, भाळवणी, अजनसोंड, तावशी या गावांमध्ये मराठी भाषेतील ४७९ कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. आढळून आलेल्या नोंदींच्या अभिलेखांचे स्कॅनिंग करुन त्याची पी.डी.एफ. गावातील सर्व रहिवाशांना ऑनलाईन प्रणालीवर शासनाचे अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध करुन दिले असल्याचे तहसीलदार बेल्हेकर यांनी सांगितले.