सुजल पाटील
सोलापूर : देशभरात कोरोना (कोविड -१९) या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे़ महाराष्ट्रातही या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत़ हा साथीचा आजार पसरू नये यासाठी सर्वच शासकीय कार्यालये सज्ज झाली आहेत़ दरम्यान, मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागाने कोरोना विषाणूपासून बचाव व नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या आहेत. १६ आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले. २ डॉक्टर्स अन् ९ कर्मचाºयांची टीम २४ तास येथील वैद्यकीय सेवा देण्यासाठी सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती रेल्वे वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ़ आनंद कांबळे यांनी ‘लोकमत’ ला दिली.
कोरोना आजाराबाबत जागरुक राहण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून देशातील सर्वच रेल्वे स्थानकातील विभागीय व्यवस्थापकांना कळविले आहे़ याबाबत रेल्वे मंत्रालय प्रशासन व मंत्र्यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाºयांशी संवाद साधून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यादृष्टीने मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात येणाºया सर्वच रेल्वे स्थानकांवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत़ कोरोना आजाराबाबत कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. प्लॅटफॉर्मवर गाड्यांच्या वेळेबाबतच्या घोषणेसोबत कोरोना होऊ नये, यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याशिवाय बुकिंग कार्यालये, चौकशी काउंटर, टीटीई इत्यादी कर्मचारी मास्क घालून काम करीत आहेत़ सार्वजनिक ठिकाणी काम करणाºया कर्मचाºयांना सॅनिटायझर दिले जात आहे. स्थानकांवर वाणिज्य विभागामार्फत कोरोनाविषयी जनजागृती करण्यात येत आहे़ स्थानकांवरील आॅडिओ आणि टीव्हीद्वारे कोरोना विषाणूविषयी संदेश प्रसारित करण्यात येत आहेत.
डॉक्टर्स अन् कर्मचाºयांसाठी प्रोटोकॉल...- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात असलेल्या डॉ़ कोटणीस स्मारक रेल्वे हॉस्पिटलमध्ये १६ आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत़ या १६ वॉर्डासाठी कोरोना संशयित प्रकरणे हाताळण्यासाठी प्रशिक्षण पूर्ण केलेले २ डॉक्टर (डॉ.मंजूनाथ, डॉ.रवीचंद्रा) आणि ९ पॅरामेडिकल कर्मचाºयांची टीम तयार करण्यात आली आहे.यात ३ सिस्टर,तीन सफाई कर्मचारी व अन्य तिघांची नियुक्ती केली आहे. याशिवाय रुग्णालयातील कर्मचाºयांसाठी पीपीई (वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे) साठी पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर आणि मास्कचा पुरवठा करण्यात आला आहे़ रुग्णांच्या व्यवस्थापनासाठी डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफमध्ये मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रोटोकॉल प्रसारित करण्यात आला आहे़ शिवाय रेल्वे रुग्णालय, सोलापूर येथे इन्फ्रारेड कॉन्टॅक्टलेस थर्मामीटरची व्यवस्था केली आहे. वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णांसाठी अँटीव्हायरल बॅरियर कीट विकत घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांनी दिली़
सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशनचा वापर- जी संशयास्पद प्रकरणे आहेत ती सिव्हिल हॉस्पिटल सोलापुरात संकलन व चाचणीसाठी संदर्भित करण्यासाठी हे कार्यालय सिव्हिल सर्जन, जिल्हा आरोग्य अधिकारी, नोडल अधिकारी आणि जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या संपर्कात आहे. सर्व आरोग्य युनिट आणि उपविभागीय रुग्णालय, स्थानिक आरोग्य प्राधिकरणाशी संपर्क साधून या नमुन्यांचा संदर्भ घेण्यासाठी आणि स्थानिक अधिसूचित प्रयोगशाळांमधील प्रकरणांचा संदर्भ घेत आहेत. दरम्यान, सोलापूरच्या रेल्वे रुग्णालयाच्या फरशा, खिडक्या, रेलिंग इत्यादी सोडियम हायपोक्लोराइड सोल्युशनचा वापर करून दिवसातून किमान पाच ते सहा वेळा साफसफाई व स्वच्छता करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली़
रेल्वे वसाहत, कॉलनी व कार्यालयात जनजागृती...- कोरोना व्हायरस या आजाराच्या जनजागृतीसाठी रेल्वे वसाहती, विभागीय रेल्वे कार्यालयात आणि रेल्वे कॉलनीमध्ये पत्रके वाटप करण्यात आली आहेत. संपूर्ण सोलापूर विभागातील विविध स्थानकावर उद्घोषणा (पीए सिस्टम) व्दारे घोषणा केली जात आहे. वाणिज्य विभागातर्फे सोलापूर विभागातील विविध स्थानकांवर व्हिडिओ क्लिपिंगही प्रदर्शित करण्यात येत आहे. पत्रिका वाटप करताना आरोग्य निरीक्षकांव्दारे कॉलनीमध्ये जनजागृती केली जाते. कोरोना (कोविड -१९) च्या जनजागृतीसाठी रुग्णालयातील महिला कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्यांना रेल्वे हॉस्पिटल कॉन्फरन्स हॉलमध्ये व्याख्यान दिले जात आहे़ रेल्वे रुग्णालय सोलापूर येथे एक नियंत्रण कक्षही सुरू करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी दिली़