उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावांत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यात कळमण आरोग्य केंद्रातील बीबीदारफळ, कळमण, कौठाळी, वडाळा व रानमसलेची संख्या सर्वाधिक आहे. बहुतांशी रुग्णांचा ऑक्सिजन कमी होत असल्याने ॲडमिट करून ऑक्सिजन सुरू करणे व गरज पडली तर व्हेंटिलेटर लावण्याची आवश्यकता आहे. मात्र, ॲडमिट करण्यासाठी बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे हाल सुरू आहेत. गत आठवड्यात आ. यशवंत माने यांनी गटविकास अधिकारी महादेव बेळ्ळे, तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीकांत कुलकर्णी व तालुक्यातील खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डाॅक्टरांची बैठक घेतली होती. या बैठकीत सेंट लुक्समध्ये कोरोना रुग्णांसाठी हाॅस्पिटल सुरू करण्यावर चर्चा झाली. त्यानुसार सेंट लुक्सच्या मेडिकल ऑफिसर शिरशेट्टी यांनी ऑक्सिजन बेडसाठीची पाइपलाइन व इतर आवश्यक कामे केली आहेत. दोन दिवसांत ही कामे पूर्ण होतील व सोमवारी रुग्णांना ॲडमिट करण्यास सुरुवात होईल, असे डाॅ. शिरशेट्टी यांनी सांगितले.
कोट
::::::::::
तालुक्यातील रुग्णांना उपचारासाठी दाखल केले जाईल. तेथे रुग्णांच्या जेवणाची सोय करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, रुग्ण घरचाही डबा मागवतील. यावर निर्णय नंतर दिला जाईल.
-श्रीकांत कुलकर्णी,
तालुका वैद्यकीय अधिकारी