सोलापूर : दुचाकीवरून ये-जा करणाऱ्यांची संख्या सोलापुरात लाखोंच्या घरात आहे. दुचाकीमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. दुचाकीवरून अपघात झाल्यास थेट मेंदूला इजा होऊन मृत्यूमुखी पडणाऱ्या वाहनचालकांची संख्या ७० ते ८० टक्के आहे. अपघातात डोक्याला गंभीर इजा होऊ नये, यासाठी हेल्मेट घालणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांची संख्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल, असेही वाहतूक शाखेने म्हटले आहे. मागील दोन वर्षात ३० हजार वाहनधारकांना तब्बल दीड कोटीपर्यंतचा दंड सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ठोठावला आहे.
हेल्मेटचा वापर स्वत:च्या भल्यासाठी अथवा सुरक्षेकरिता आहे. प्रत्येक वाहनधारकाने दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा. डोक्याला झालेली दुखापत किंवा आघात त्याचा परिणाम पेशंटवरच होत नाही तर त्याच्या कुटुंबीयांवर होतो. अपघातांचा मानसिक, शारीरिक व आर्थिकदृष्ट्या परिणाम पेशंटसह सर्वांवर होतो. त्यामुळे स्वत:सोबतच आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरा, असे आवाहन वाहतूक शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.
डोक्याची दुखापत होऊन तरुण किंवा घरातील कमावणारी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर बरे होण्यास जास्त वेळ लागल्यास त्याचा कुटुंबावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येते. सध्या हेल्मेटविना गाडी चालविणे तसेच गाडी चालविताना हेडफोनचा वापर करून मोबाइलवर बोलत राहण्याचा नवा ट्रेंड सुरू आहे. हा प्रकार खूपच धोकादायक आहे.
हेल्मेट न वापरल्यास दंड किती ?दुचाकी चालविताना प्रत्येकाने हेल्मेटचा वापर नक्की करावा. हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांना वाहतूक शाखेच्यावतीने १ हजार रुपये दंड केला जातो. वारंवार तोच नियम मोडल्यास दंडाची रक्कम वाढते. दंड न भरल्यास वाहनधारकास कोर्टाची पायरी चढावी लागते, असेही वाहतूक शाखेने सांगितले.
आधुनिक काळात मेंदू सुरक्षित राहण्यासाठी हेल्मेट आवश्यक आहे. स्वतःच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणे हिताचे ठरू शकते. डोक्याला मार लागल्याने अनेकांचा अपघातात मृत्यू होतो. तर अनेकांना अपंगत्व प्राप्त होते. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांची संख्या निश्चितच कमी होऊ शकते.
- विनोद घुगे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, सोलापूर ग्रामीण