सोलापूर : ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण परदेशात आढळल्यानंतर आता देशात तसेच महाराष्ट्रातही आढळत आहेत. भविष्यात जिल्ह्यातही या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) तयार असून, आयसीयूच्या ३०० खाटा सज्ज आहेत.
या विषाणूविरोधात लढण्यासाठी लसीकरण गरजेचे असून, नागरिकांनी दोन्ही डोस प्राधान्याने पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राथमिक उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर शारीरिक अंतराचे पालन करणे गरजेचे आहे. हाताचे निर्जंतुकीकरण करणे महत्त्वाचे आहे.
ओमायक्रॉन हा विषाणू नवा असला तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. शासकीय नियमावलीचे पालन केल्यास या विषाणूपासून दूर राहता येते, अशा सूचना आरोग्य विभागातर्फे करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जात आहेत.
---------
ग्रामीण भागात नऊ ठिकाणी ऑक्सिजन टँक
तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयाने तयारी केली आहे. ग्रामीण भागात नऊ ठिकाणी ऑक्सिजन टँक उभे केले असून, दोन ठिकाणी हवेतून ऑक्सिजन तयार करणारी यंत्रणा कार्यान्वित केली असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी सांगितले. लसीचे दोन्ही डोस घेऊन शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
------
ऑक्सिजन - ३२ मेट्रिक टन
------
उपलब्ध औषधे
- रेमडेसिविर - ९६९
- फॅविपीरावीर - ५६,२०८
- इन्ट्राव्हेनस इम्युनोग्लोब्युलिन- १५७
--------
आयसीयू बेड
लहान मुले- १००
इतरांसाठी- २००
एकूण- ३००
----------
व्हेंटिलेटर
- लहान मुलांसाठी- ६०
- इतरांसाठी- ११०
- एकूण व्हेंटिलेटर- १७०
---------
ओमायक्रॉनला अटकाव घालण्यासाठी सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे. प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घ्यावेत. हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर हे नियम पाळावेत. ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालय सज्ज आहे. आयसीयू बेड, व्हेंटिलेटर यासह औषधांचा साठादेखील पुरेसा आहे.
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, शासकीय रुग्णालय
-----------
ओमायक्रॉनची लक्षणे
- - घसा दुखणे
- - थकवा जाणवणे
- - सौम्य ताप येणे
- - स्नायू दुखणे
- - कफ होणे
---------