सोलापूर : परिवहन विभागाने रिक्षा परमिट खुले केल्याचा फायदा शहरातील साडेचार हजार बेरोजगारांनी घेतला आहे. गेल्या २० दिवसात शहरात ३०५ नव्या रिक्षांची आरटीओ कार्यालयात नोंदणी झाली आहे.
बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे रिक्षा परमिट खुले करण्यात यावेत, अशी मागणी होत होती. परिवहन विभागातर्फे जानेवारीपासून रिक्षांचे परमिट खुले करण्यात आले. त्यामुळे आॅनलाईन नोंदणी करून रिक्षा परमिट घेण्यासाठी युवकांची गर्दी वाढली आहे. तीन महिन्यात साडेचार हजार परमिटसाठी नोंद झाली आहे. परमिट घेतलेल्यांना रिक्षा खरेदी करण्याची अट आहे. जानेवारीमध्ये दररोज १0 ते २0 नव्या रिक्षांची भर पडत होती. आता मार्चमध्ये दररोज ६0 ते ७0 रिक्षांची नोंदणी होत आहे.
शहरात यापूर्वीच्या परमिटच्या ६३00 रिक्षा होत्या. स्क्रॅप रिक्षा वाढल्याच्या तक्रारी आल्यावर आरटीओ व वाहतूक पोलिसांतर्फे संयुक्त मोहीम राबवून सुमारे १२00 स्क्रॅप रिक्षा पकडण्यात आल्या. आता नव्या साडेचार हजार रिक्षांची शहरात भर पडणार आहे. अशाप्रकारे शहरात सुमारे अकरा हजार रिक्षा रस्त्यावर धावणार असे चित्र दिसत आहे.
प्रवास स्वस्त झाला- रिक्षांची संख्या वाढल्याने प्रवास स्वस्त झाला आहे. सध्या शहरात मनपा परिवहन बससेवेची यंत्रणा वाईट स्थितीत आहे. त्यामुळे या रिक्षांना चांगली कमाई होत आहे, पण बससेवा सुधारल्यावर मात्र रिक्षाचालकांच्या व्यवसायावर संकटे येऊ शकतात. सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेबाबत यापूर्वी नियुक्त केलेल्या समितीच्या अभ्यासानुसार १ लाख लोकसंख्येमागे ८00 रिक्षांची गरज असल्याचे म्हटले होते. सोलापूरची लोकसंख्या साडेनऊ लाख गृहीत धरल्यास ८ हजार रिक्षांची गरज भासणार आहे. पण आता परमिट खुले केल्यानंतर ही संख्या अकरा हजारावर जात आहे. त्यामुळे आता रिक्षाथांबे वाढवावे लागणार आहेत.
सध्या शहरात ३३९ रिक्षाथांबे आहेत. एका थांब्यावर पाच रिक्षा असाव्यात, असे व्यवसाय सूत्र आहे. पण बस व रेल्वे स्थानकावर रिक्षांची मोठी संख्या असते. राज्यात सर्वात जास्त सोलापुरात प्रतिसाद मिळाला आहे. नाशिकला अवघे ४00 परमिट घेण्यात आले आहेत.
बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी रिक्षा परमिट खुले करण्यात आले. याला सोलापुरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. महिलांसाठी परमिट खुले आहेत. पण फक्त एका संस्थेने २२ महिलांना परमिट मिळवून दिले, पण त्यांनी अद्याप रिक्षांची नोंदणी केली नाही. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांना मोफत परमिट दिले आहे. - बजरंग खरमाटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी