सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी शिवानंद फुलारी या शेतकऱ्याला ३0९ किलो कांद्याचे तब्बल ६१८00 रुपये मिळाले. त्यांच्या कांद्याला तब्बल २00 रुपये दर मिळाला. राज्यातील अन्य बाजार समित्यांमध्ये क्विंटलला सर्वाधिक १५ हजार रूपयाने कांदा विक्री झाला.अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील शिवानंद फुलारी यांनी दोन एकर कांदा लागवड केली होती. दीड एकरापेक्षा अधिक क्षेत्रावरील कांदा काढणी केल्यानंतर तो केवळ ७५३ किलो भरला. त्यातील ३0९ किलो कांद्याला प्रति किलो २00 रुपये दर मिळाला तर ४८ किलो कांद्याला १२0 रुपये किलोचा दर मिळाला. इतर खर्च वजा जाता त्यांना ६२ हजार ६९३ रुपये मिळाल्याचे अडते आतिक नदाफ यांनी सांगितले. २00 रुपये किलोचा कांदा चेन्नईला पाठविला जाणार असल्याचे खरेदीदार आर.एच.एस. अॅण्ड कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.लासलगाव येथील बाजार समितीत लाल कांद्याने गुरुवारी दहा हजारांचा टप्पा पार केला. या हंगामातील हा सर्वाधिक दर ठरला.
३0९ किलो कांद्याचे झाले ६१,८00 रुपये!; सोलापूरमध्ये विक्रमी २00 रुपये किलो भाव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 4:01 AM