सोलापूर : माढा लोकसभा निवडणुकीसाठी ३१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी सहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. या निवडणुकीसाठी एकूण ४२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यात पाच उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद ठरल्याने ३१ उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी पात्र ठरले होते.
उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी जनसेवा संघटनेचे प्रभाकर देशमुख, करमाळ्याचे अपक्ष उमेदवार अशोक वाघमोडे, माढ्याचे विठ्ठल ठावरे, पंढरपूरचे रामचंद्र गायकवाड, फलटण येथील सह्याद्री कदम, सोलापूरचे बशीर शेख यांनी उमेदवारी मागे घेतली.
या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर, राष्ट्रवादीचे संजय शिंदे, बहुजन महापार्टीचे शहाजहान शेख, हिंदुस्थान प्रजा पार्टीचे नवनाथ पाटील, वंचित बहुजन आघाडीचे विजयराव मोरे, भारतीय प्रजा सुराज्यचे नानासाहेब यादव, बहुजन मुक्ती पार्टीचे सुनील जाधव, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे रामचंद्र घोतुकडे, बहुजन समाज पार्टीचे आप्पा लोकरे, अखिल भारतीय एकता पार्टीच्या ब्रह्माकुमारी प्रमिला,बहुजन आझाद पार्टीचे मारुती केसकर आदी प्रमुख उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
अपक्ष उमेदवार म्हणून माळशिरसचे सचिन पडळकर, खटावचे अजिंक्य साळुंखे, पंढरपूरचे आण्णासाहेब म्हस्के, मोहोळचे सिध्देश्वर आवारे, सांगोल्याचे दत्तात्रय खटके, दिलीप जाधव,शिरुरचे दौलत शितोळे, फलटणचे नंदू मोरे, सांगोल्याचे मोहन राऊत, चिंचवडचे रामदास माने, सोलापूरचे रोहित मोरे, माळशिरसचे विजयराज माने-देशमुख, साताºयाचे विजयानंद शिंदे, पंढरपूरचे विश्वंभर काशिद, माळशिरसचे सचिन जोरे, सोलापूरच्या सविता ऐवळे, फलटणचे संतोष बिचकुले, माणचे संदीप खरात, संदीप पोळ आदी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत तीन वाजता संपली . यानंतर निवडणुकीतील अंतिम उमेदवारांची सायंकाळी बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. माढा लोकसभा निवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र शिंदे यांनी पत्रकारांना दिली.
१५ मिनिटच राहिले असताना अर्ज भरला अन् काढलाहीउमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ पंधरा मिनिटांचा कालावधी उरला असतानाच जनसेवा शेतकरी संघटनेचे उमेदवार प्रभाकर देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज माघार घेतानाही केवळ पंधरा मिनिटांचा कालावधी शिल्लक असतानाच त्यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतला.