पंढरपूर: पंढरपूर तालुक्यात गेल्या चार महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाची तालुक्यात आजवरच्या इतिहासात सर्वाधिक अवकाळी पाऊस अशी नोंद झाली आहे. तालुक्यात हाहाकार माजवून कोट्यवधी रूपयांचे नुकसान करणारा हा अवकाळी पाऊस तालुक्यातील पुळूज परिमंडलामध्ये सर्वाधिक ६४.९ मी.मी. तर करकंब परिमंडलात सर्वात कमी ५.२ मी. मी तर तालुक्यात तब्बल ३१७.२ मी. मी अशी नोंद झाली आहे. वादळी वारा, तुफानी गारपिटीसह झालेल्या या अवकाळी पावसाने तालुक्यात कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले होते. पंढरपूर तालुक्यात एकूण नऊ ठिकाणी असणार्या परिमंडळाव्दारे पावसाचे पर्जन्यमापन केले जाते. यामध्ये फेब्रुवारी ते मे २०१४ पर्यंत या चार महिन्यात पंढरपूर शहर परिमंडलामध्ये २९.४, चळे ३८.१४, पटवर्धन कुरोली ३४.४, पुळूज ६४.९ , तुंगत ६४.६, भाळवणी २६, कासेगाव ३१.१, भंडीशेगाव २३.६, कारकंब ५.२ मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. पंढरपूर तालुक्यातील काही भागात यापूर्वीही अवकाळी पाऊस झाला आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस होण्याची आजवरच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. पंढरपूर तालुक्यात वादळीवार्यासह तुफानी गारपीट झाली होती. यामध्ये सर्वाधिक पाऊस पुळूज, तुंगत, पटवर्धन कुरोली, चळे सर्कलमध्ये झाला होता. या अवकाळी पावसामुळे या परिसरातील शेतकर्यांचे द्राक्ष, डाळिंब, ऊस, गहू , मका, निंंबोणी , हरभरा आदी पिके व फळबागांचे मोठे नुकसान होऊन शेतकर्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले होते. घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड होऊन अनेक सर्वसामान्य नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली होती. याशिवाय हा अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जनावरांनाही मोठा फटका बसून शेकडो जनावरे दगावली होती. त्यामुळे मागील दोन वर्षाच्या भीषण दुष्काळातून सावरू पाहणार्या शेतकर्यांचे कंबरडे मोडले होते. या झालेल्या अवकाळी पावसामुळे आता सुरू होत असलेल्या पावसाळी हंगामात समाधानकारक पाऊस पडेल का, याबाबत अनेक तज्ज्ञांनी साशंकता व्यक्त केली आहे. तसे झाल्यास सर्वसामान्य शेतकर्यांसमोर पुढील हंगामात आपली पिके वाचविण्याचे मोठे आव्हान आसणार आहे.
सर्वात मोठी गारपीट
मागील तीन महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसात गारपिटीचा मोठा समावेश होता. या अवकाळी पावसात झालेली गारपीट ही गेल्या पन्नास वर्षांच्या इतिहासात कधीही झालेली नाही. त्यामुळे आजवरची सर्वात मोठी गारपीट म्हणून या गारपिटीची सरकार दरबारी नोंद झाली आहे.