मागील तीन दिवसांपासून शहर व तालुक्यात युद्धपातळीवर कोरोना चाचणी केली जात आहे. यामुळे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. बुधवारी अक्कलकोट येथील नगरपालिका टीमने एस. टी. स्टॅण्ड येथे तपासणी शिबिर घेतले. तेव्हा फळविक्रेते, किराणा दुकानदार, बेकरी आदी क्षेत्रातील व्यावसायिकांची कोरोना तपासणी केली असता ९ जण पॉझिटिव्ह आले. तसेच ग्रामीण भागातसुद्धा आरोग्य विभागाचे पथक तपासणी करीत आहे. त्यामध्ये चुंगी, मैंदर्गी, कोळेकरवाडी, सुलेजवळगे, समर्थनगर, रामपूर या ठिकाणी प्रत्येकी एक असे एकाच दिवशी एकूण १५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.
गुरुवारी अक्कलकोट शहरात कारंजा चौक, माणिक पेठ, सावरकर चौक असे विविध ठिकाणी तपासणी केली असता १० जण कोरोना पॉझिटिव्ह निघालेले आहेत. तसेच ग्रामीण भागात ७ जण पॉझिटिव्ह निघालेले आहेत. असे एकूण १७ रुग्ण एकाच दिवसात आढळून आलेले आहेत. ३१३ जणांची अँटिजेन तपासणी केली आहे.
याकामी डॉ. अशोक राठोड, डॉ. अश्विन करजखेडे, विस्तार अधिकारी महेश भोरे, मुख्याधिकारी सचिन पाटील, विठ्ठल तेली, मलिक बागवान, भागवत सांगोलकर, नवनाथ शिंदे आदी परिश्रम घेत आहेत.