करमाळा : एका गरीब शेतकऱ्याच्या ३२ शेळ्या विजेची तार तुटून बसलेल्या धक्क्याने जागीच मरण पावल्याची दुर्देवी घटना केतूर नंबर १ येथे नवले वस्तीवर शनिवार पहाटे घडली.हा दुर्दैवी प्रकार घडला आहे तात्याराम बाबा कोकणे या शेतकऱ्याबाबत. शुक्रवारी रात्री त्यांनी शेळ्या नेहमी प्रमाणे नवले वस्तीवर गोठ्यात बांधल्या होत्या. या गोठ्याजवळून वीज वितरण कंपनी केबल गेली आहे. शनिवार पहाटे ५ ते ६ च्या दरम्यान ही केबल तुटून गोठ्यावर पडली. त्याचा करंट लागून ३२ शेळ्या तडफडून जागीच मरण पावल्या. या प्रकारानंतर केतूरचे तलाठी भाऊसाहेब माने व पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर सोमनाथ खरात यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पंचनाम्यावेळी हनुमंत नवले, राजू खटके, विष्णू कुंभार, नितीन देवकते उपस्थित होते.
शेतकऱ्याची चूक काय?
खूप कष्टाने कोकणे यांनी या शेळ्यांचा सांभाळ केला होता. आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. या शेळ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित झालाय. प्रसार माध्यमांशी बोलताना माझी चूक काय होती, असा प्रश्न केला. शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.