या निवडणुकांमध्ये विधानसभा किंवा इतर निवडणुकीपेक्षा जास्त चुरस पाहवयास मिळते. तहसीलदार तथा प्राधिकृत अधिकारी प्रदीप शेलार यांनी या निवडणुकासाठी नमुना ''अ''ची नोटीस प्रसिद्ध केली आहे. निवडणुकीचा नेमका प्रोग्रॅम कसा असणार तसेच संबंधित गावासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तहसील कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीस मार्गदर्शन करताना तहसीलदारांनी वरील सूचना दिल्या. १५ डिसेंबर म्हणजे मंगळवारी निवडणुकीच्या नोटिसा बजावण्यात आल्या. यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीच्या बाहेर फलकावर संपूर्ण प्रोग्रॅम प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच कोणत्या गावासाठी कोणत्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. याचादेखील समावेश आहे.
२३ ते ३० डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकृती करण्यात येणार आहे. या काळात २५, २६, २७ डिसेंबर या दिवशी शासकीय सुटी असल्याने या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाही आहेत. उमेदवारांना पाच दिवसच ११ ते ३ यावेळेत अर्ज भरण्याकरिता संधी मिळाली आहे. ३१ डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होणार असून, माघार ४ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत घेता येणार आहे. त्याच दिवशी दुपारी ३ नंतर चिन्ह व यादी देण्यात येणार आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, मतमोजणी ही १८ जानेवारी रोजी होणार आहे. २१ जानेवारीपर्यंत तालुक्यात आचारसंहिता लागू केली आहे. ९६ ग्रामपंचायतींमध्ये ३१३ प्रभाग असून, यामध्ये ८३० सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे.
----
यंदा चुरस कमी असेल
४ जानेवारी रोजी चिन्ह वाटप झाल्यापासून ते १३ जानेवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत उमेदवार आपला प्रचार करू शकतो. एका उमेदवाराला एका प्रभागातील एका जागेवर निवडणुका लढविता येतील व बहुप्रभागात वेगवेगळ्या ठिकाणी तो उभा राहू शकतो. या निवडणुकीत उपजिल्हाधिकारी निरीक्षक म्हणून राहणार आहेत. शासनाने यावेळी सरपंच निवडीचा आरक्षण निवडणुकीच्या नंतर ठेवल्याने नेहमीपेक्षा या निवडणुकीमध्ये चुरस कमी प्रमाणात दिसून येणार आहे.
----
तीन ग्रामपंचायतींसाठी अशी रचना
बार्शी तालुक्यातील या निवडणुकीसाठी तीन ग्रामपंचायतींसाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी, तर त्यांच्या जोडीला तलाठी व ग्रामसेवक असे दोन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मदतीला नियुक्त केले असल्याचे तहसीलदार शेलार यांनी सांगितले.