भीमानगर : भीमा खो-यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी विश्रांती घेतली. त्यामुळे ६९ हजार ३३३ वर गेलेला विसर्ग रविवारी २५ हजार क्युसेकवर आला आहे. दरम्यान, वजा २३ टक्क्यांवर उजनीची पाणीपातळी गेलेली असताना या तीन दिवसात उपयुक्त ३५ टक्क्यांवर पोहोचली आहे. रविवारी सकाळपर्यंत भीमा खोऱ्यात व मुळा मुठाच्या उपखोऱ्यात १२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
भीमा खो-यातील कळमोडीवर ५५ किलोमीटर, घोड उपखोऱ्यात माणिकडोह ३५, पिंपळजोगे ५५, मुळशी ६२, टेमघर ९०, वरसगाव ७०, पानशेत ६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. खडकवासला १६६०, वडिवळे ३००, कळमोडी १९०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. खडकवासला प्रकल्पातील विसर्ग कमी केल्याने पुणे येथील बंडगार्डनचा विसर्ग १४५४५ हजार क्युसेक इतका झाला आहे. उजनीत येणारा विसर्ग रविवारी संध्याकाळी सहा वाजता २५४४५ क्युसेक इतका झाला आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता उजनी धरण ३२ टक्के झाला आहे.
----
उजनीची सद्यस्थिती
पाणी पातळी ४९३. १५५ मीटर
एकूण पाणीसाठा २२६६.१५ दलघमी (टीएमसी ८०.६५)
उपयुक्त पाणीसाठा ४६३.३४ दलघमी (टीएमसी १६.३६)
विसर्ग बंडगार्डन १४५४५
दौंडमधून २५४०७
टक्केवारी ३३
---