कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत दीर्घकाळ लॉकडाऊन झाल्यामुळे उद्योग, व्यवसाय बंद होते. अशात वीजबिलांची दरवाढ झाली. या पार्श्वभूमीवर महावितरणकडून मीटर रीडिंग घेणे बंद केले. ग्राहकांना बिल भरण्यासाठी पोर्टल आणि मोबाईल ॲपची सुविधा दिली. ग्राहकांना स्वतः मीटर रीडिंग अपलोड करण्याविषयी आवाहन केले. रीडिंग पाठवणाऱ्या ग्राहकांना ऑनलाईन बिले व मोबाईल संदेशाद्वारे सरासरी बिले पाठवली.
वीज बिलासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असली तरी ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे घरगुती व औद्योगिक ग्राहकांकडे थकबाकी वाढत गेली. सध्याच्या परिस्थितीत सरकारने कोरोनाविषयक निर्बंध शिथिल केल्याने उद्योग, व्यवसाय पूर्वपदावर येऊ लागले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी वीजबिल भरणे आवश्यक आहे. अन्यथा वीज कनेक्शन बंद करणे अनिवार्य आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपल्याकडील थकबाकी भरून महावितरण कंपनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
वीज ग्राहकांकडील थकबाकी
सांगोला तालुक्यातील २९ हजार ६९१ घरगुती ग्राहकांकडे ७ कोटी ७४ लाख ८० हजार, ३ हजार ०८८ व्यावसायिकांकडे १ कोटी ९९ लाख ८२ हजार, ४१६ औद्योगिक ग्राहकांकडे ७५ लाख ६२ हजार, शासकीय कार्यालयाच्या २४६ ग्राहकांकडे १९ लाख ४७ हजार, इतर २३ ग्राहकांकडे १ लाख ७० हजार, ३० हजार ५३८ शेतीपंप ग्राहकांकडे २८८ कोटी ३५ हजार, पाणीपुरवठा १७३ ग्राहकांकडे ६ कोटी ६८ लाख ९५ हजार, ४५८ पथदिवे ३९ कोटी ६३ लाख ९८ हजार अशा ६४ हजार ६३४ ग्राहकांकडे ३४५ कोटी ४ लाख ६९ हजार रुपयांची थकबाकी आहे.