करकंब आरोग्य केंद्रांतर्गत उंबरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, तर करोळे, सांगवी, नांदोरे, बार्डी, पटवर्धन कुरोली, करकंब एक आणि दोन अशी सात आरोग्य उपकेंद्रे आहेत. सध्या उंबरे आणि करकंब येथे लसीकरण केंद्रे आहेत. प्रत्येक प्राथमिक उपकेंद्रात आठवड्यातून एकदा तरी त्या-त्या आरोग्य उपकेंद्रात लसीकरण व्हावे, अशी नागरिकांकडून मागणी असतानाही केवळ करकंब ग्रामीण रुग्णालय आणि उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरण केले जात आहे.
पटवर्धन कुरोली येथून उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्र हे जवळपास ३५ ते ४० किलोमीटरवर आहे. या ठिकाणी पटवर्धन कुरोली उपकेंद्रातील सर्व गावांतील नागरिकांच्या लसीकरणाची व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे बंद असलेली वाहतूक, जास्त अंतर, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांची इच्छा असूनही तेथे लसीकरणासाठी जाण्याचे धाडस कोणी करत नाही. दररोज येणाऱ्या या अडचणींमुळे आठवड्यातून एक दिवस गावातच लसीकरण करावे, अशी मागणी नागरिक करत होते. मात्र, आरोग्य अधिकारी ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. लसीकरण सुरू झाल्यापासून पटवर्धन कुरोली आरोग्य उपकेंद्रात केवळ एकदाच लसीकरण करण्यात आले.
लसीकरणाबाबत आरोग्य विभाग गाफील
पटवर्धन कुरोली उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या पटवर्धन कुरोली, उजनी वसाहत, आव्हे, तरटगाव या गावांमध्ये केवळ २१९ जणांचे लसीकरण केले आहे. त्यापैकी १११ जणांचे २२ एप्रिल रोजी पटवर्धन कुरोली येथे लसीकरण केले. त्यानंतर दीड महिन्याच्या कालावधीत फक्त १०८ लोकांचे लसीकरण केले. ही बाब धक्कादायक असून, आरोग्य विभाग पूर्ण गाफील असल्याचे चित्र आहे.
आरोग्य उपकेंद्र असून अडचण, नसून खोळंबा
कोरोनाच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करून संसर्ग व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असले तरी स्थानिक प्रशासनाच्या कामचलाऊ धोरणामुळे अनेक वृद्ध नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे आरोग्य उपकेंद्रांची असून अडचण, नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा प्रकार थांबवून प्रत्येक गावात जाऊन सरसकट लसीकरण करण्याची मागणी पटवर्धन कुरोलीचे सरपंच गणेश उपासे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
कोट ::::::::::::::::::
तालुका आरोग्य विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने प्रत्येक आरोग्य उपकेंद्रात लसीकरण करताना अडचणी निर्माण होत आहेत. मात्र, मागील दोन महिन्यांत मनुष्यबळ कमी असूनही कोरोना वाॅरिअर्सच्या मदतीने ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी कोरोना निर्मूलन लढ्यात अखंडित सेवा देत आहोत. ज्या ठिकाणी अशा अडचणी येत आहेत, अशा ठिकाणी हंगामी व्हॅक्सिनेटरची नेमणूक करून लसीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नवीन भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे येत्या काही दिवसांत लसीकरण सुरळीत होईल. नागरिकांनी सहकार्य करावे.
- डाॅ. एकनाथ बोधले
तालुका आरोग्य अधिकारी, पंढरपूर