सोलापूर: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवर बुधवारअखेर ३५२ हरकती दाखल झाल्या. या हरकतींवर उद्यापासून (गुरुवारी) ते ७ मेपर्यंत सुनावणी घेण्यात येणार आहे. सुनावणीनंतर १४ मेपर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी सांगितले.
बुधवारी प्रारूप यादीवर हरकत दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. शेतकरी मतदारसंघातून ७८ तर व्यापारी मतदारसंघातून २७४ हरकती दाखल झाल्या आहेत. दाखल झालेल्या हरकतींमध्ये मतदारयादीत नाव समाविष्ट करण्याबाबतच्या हरकती मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगण्यात आले.
बाजार समितीच्या प्रारूप मतदार यादीत शेतकºयांसाठी असलेल्या १५ गणात १ लाख १६ हजार ५५६ तर व्यापारी, हमाल आणि तोलार गणात २ हजार २७४ असे एकूण १ लाख १८ हजार ८३० मतदार आहेत. यापूर्वी पणन विभागाच्या निकषानुसार सात-बारा उताºयावरील पहिल्या क्रमांकाच्या खातेदाराला मतदार म्हणून निवडले होते. मात्र यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर २० मार्चला सुधारित निकष जाहीर करण्यात आले.
त्यानुसार उताºयावरील दहा गुंठे क्षेत्र वाट्याला येणाºया सर्व खातेदारांचा मतदार यादीत समावेश करण्याचे निश्चित झाले. या पध्दतीनेच प्रारूप यादी प्रसिध्द झाली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंतिम मतदार यादी प्रसिध्द केल्यानंतर त्यापुढील तीन महिन्यांत बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया संपवावी लागणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून युध्दपातळीवर नियोजन आखले आहे.