सोलापूर : पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यालयाने मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला असून शुक्रवार, २७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात ३६ लाख ३३ हजार ७२ मतदार असून यंदा ३६ हजार ८६६ नव्या मतदारांची भर पडली आहे. तृतीयपंथी, देहविक्री करणाऱ्या महिला तसेच भटक्या विमुक्त जमाती आदींसाठी २ व ३ डिसेंबर रोजी विशेष शिबिर आयोजित केल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात ४ हजार ४८१ सैनिक मतदार आहेत. तसेच २५९ तृतीयपंथी मतदार असून जिल्ह्यात ४ हजार ४८१ सैनिक मतदार आहेत. तसेच २५९ तृतीयपंथी मतदार आहेत. जिल्ह्यात एकूण १८ लाख ८९ हजार २३४ पुरुष मतदार तसेच १७ लाख ४३ हजार ५७९ महिला मतदार आहेत. यंदा ३६ हजार ८६६ नवीन मतदारांची भर पडली असून यात १९ हजार युवा मतदार आहेत. पूर्वी जिल्ह्यात ३ हजार ५६९ मतदान केंद्र आहेत.
यंदा ३२ नवीन मतदान केंद्रांची वाढ झाली आहे. २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबर दरम्यान जिल्ह्यात विशेष मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम राबवला जाणार आहे. एक जानेवारी २०२४ रोजी अठरा वर्षे पूर्ण होणाऱ्या युवकांचा या मतदार यादी समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. पत्रकार परिषदेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निर्हाळी हे उपस्थित होते.